लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरालगत असलेल्या कुडवा-कटंगीकला येथे पॅराअर्बन योजनेंतर्गत अतिरिक्त पाईपलाईन टाकणे व प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्यासाठी अतिरिक्त ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या अंदाजपत्रकाला लवकरच मंजुरी मिळणार असून, यामुळे परिसरातील नागरिकांना शुध्द पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कुडवा-कंटगीकला येथील पॅराअर्बन योजनेची नेमकी काय स्थिती आहे, पाईपलाईन टाकून नागरिकांना नळजोडणी केव्हापर्यंत मिळेल, याची नेमकी स्थिती जाणून घेण्याचे निर्देश माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पटले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिलेश सेठ यांना दिले होते. याच अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी कार्यकारी अभियंता चंद्रिकापुरे यांनी या योजनेसाठी ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करुन शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करुन नवीन नळजोडण्या देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच नळ योजनेच्या बिलांचे संकलन करण्यासाठी याच ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कुडवा-कटंगीकला येथील नागरिकांना लवकरच शुध्द पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.