गोंदिया : जिल्ह्यात खरिपाच्या धान कापणीला सुरूवात झाली आहे. हलक्या धानाची ही कापणी होत असून खरिपाचा हा धान बाजारात आला आहे. विशेष म्हणजे धान विकण्यासाठी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला आहे. बाजार समितीने ३ आॅक्टोबरपासून धान खरेदीला सुरूवात केली असून आतापर्यंत सुमारे १४०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. सुरूवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने यंदाचा खरिपाचा हंगाम वांद्यात असल्याचा अंदाज शेतकऱ्याने बांधून घेतला होता. त्यात शेवटी एक पाणी लागत असताना ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने धान पाहिजे तसे भरले नाही. शिवाय विविध रोगराईने धान पिकांवर फटका बसला. तरिही आले तेवढे बरे असे माणून शेतकरी हलक्या धानाच्या कापणीला लागला आहे. जिल्ह्यात सध्या जोमात धान कापणी होत असून शेतकरी हाती आलेले धान विकण्यासाठी बाजारात आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे हक्काचे स्थान समजली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या स्वागतार्थ सज्ज असून येथे धान खरेदीला सुरूवात झाली आहे. येथील बाजार समितीबाबत सांगायचे झाल्यास ३ आॅक्टोबरपासून समितीने खरिपाच्या धान खरेदीला सुरूवात केली असून आतापर्यंत सुमारे १४०० क्विंटल धान खरेदी समितीने केली आहे. यामध्ये १०१० व आयआर या धानाची आवक सध्या जास्त आहे. दिवाळी तोंडावर असल्याने लवकरात लवकर धानाची कापणी करून हाती आलेल्या धानाची विक्री करून पैसा कमविण्यासाठी शेतकरी लगेच धान विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहे. यामुळे मात्र धानात ओलावा असल्याने धानाला पाहिजे तसे दर मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. बाजार समितीत सध्या ११००- १२५० रूपये दराने धानाची खरेदी केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)पहिले आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार ४खरिपाचे धान विक्रीसाठी घेऊन आलेल्या प्रथम तीन शेतकऱ्यांचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. या शेतकऱ्यांना बाजार समितीने चांदीचा सिक्का भेट स्वरूप दिला. अवैध धान काट्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक होते. शिवाय पैशांसाठी त्यांना चकरा माराव्या लागत असल्याचे प्रकार घडतात. या सर्व प्रकारांना बळी न पडता शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काच्या बाजार समितीतच धान विक्री करावी यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी बाजार समितीने हा उपक्रम राबविला. आधारभूत किंमत जाहीर झालीच नाही४शासनाने आतापर्यंत धानाची आधारभूत किंमत जाहीर केलेली नाही. तसे शासकीय आदेश सुद्धा बाजार समितीला अद्याप प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जुन्याच आधारभूत किंमतीला गृहीत धरले जात आहे. आता काही दिवसांनी मोठ्या प्रमाणात धान बाजारात येणार. अशात आधारभूत किमतीसाठी सर्वांच्या नजरा शासनाकडे लागल्या आहेत. शिवाय आतापर्यंत होत असलेल्या प्रती एकर १२ क्विंटल धान खरेदीला वाढवून त्याला २५ क्विंटल करण्यात यावे अशी मागणीही शेतकरी करीत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची हक्काची जागा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अवैध धान काट्यांवर आपले धान विक्री करून फसण्यापेक्षा बाजार समितीतच धानाची विक्री करावी. - सुरेश जोशी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, गोंदिया.
खरिपाचे धान आले बाजारात
By admin | Updated: October 27, 2015 02:01 IST