नवेगावबांध : अर्जुनीमोर तालुक्याचे भूषण ठरलेली, शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त, स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत, सिरेगावबांध लोकहिताचे अनेक निर्णय घेऊन आदर्श ग्रामपंचायत ठरण्याच्या मार्गावर आहे. सरपंच दादा संग्रामे यांनी ग्रामपंचायतीमार्फत घेतलेल्या लोकहिताच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
या आदर्श ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता नांदावी म्हणून प्रतिकुटुंब २ कचरापेट्या देण्यात आल्या. यात ओला कचरा व सुका कचरा अशा दोन प्रकारच्या कचरा पेट्यांचा समावेश आहे.
गावात मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीने गावातील ज्या कुटुंबामध्ये मुलींचा जन्म झाला, अशा कुटुंबांना दोन हजार रुपये अनुदान फिक्स डिपॉझिटच्या रुपाने मुलींच्या नावे २० वर्षांसाठी जमा करण्यात आला. यामध्ये शिल्पा श्यामसुंदर वाघाये व अश्विनी राकेश मरस्कोले यांना हा लाभ देण्यात आला. दरवर्षी ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणारा ग्रामरत्न हा पुरस्कार राजीराम कापगते यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. गावातील दहावी व बारावीमध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र देण्यात आले. यामध्ये दहाव्या वर्गाचे ७ आणि १२वी १ अशा एकृूण ८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. २०१९-२० या सत्रात पाचव्या वर्गातील क्रेजा हेमकृष्ण संग्रामे हिने शिष्यवृत्ती पात्रता परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल एक हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याच विद्यार्थिनीने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश प्राप्त केले. गुणवंत विद्यार्थी म्हणून तिचा गौरव करण्यात आला. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.