आरोग्य विभाग : वाहन चालक संघटनेची मागणीगोंदिया : जिल्ह्यातील आरोग्य विभागात तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी वाहनचालकांना आर्थिक समस्या भेडसावत आहे. २४ तास कामावर असूनही त्यांना केवळ सहा ते आठ हजार रूपये मासिक वेतन मिळते. या अल्प मोबदल्यात त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाही. त्यामुळे मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी १७ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोग्य विभागात वाहन चालक अत्यंत कमी मानधनात प्राथमिक आरोग्य केंद्रांत २४ तास नोकरी करतात. अत्यंत कमी मानधनात वाहन चालकाचे काम करणे शक्य नाही. आजच्या महागाईच्या काळात आठ तास काम करणारे लोकसुद्धा दैनिक ३०० ते ४०० रूपये मजुरी घेतात. मात्र आरोग्य विभागात २४ तास काम करणाऱ्या वाहन चालकांना सहा हजार ते आठ हजार रूपये महिना पडतो. आजच्या काळात मुलाबाळांना शिकविणे ही मोठी समस्या वाहन चालकांसमोर उभी ठाकली आहे. त्यांची मुले दहावीपर्यंत शिक्षण घेऊन घरी पूर्वीपासून चालत आलेली कामे करतात. शेतमजुरीशिवाय त्यांना कोणतेही पर्याय नाही.वाहन चालकांच्या या आर्थिक समस्येकडे लक्ष देऊन त्यांच्या तुटपुंज्या मानधनात वाढ करून कमीतकमी १५ हजार रूपये मानधन देण्यात यावे, अशी जिल्हा वाहन चालक सेवक असोसिएशनचे अशोक थुल, संतोष रहांगडाले, चंद्रशेखर चंद्रिकापुरे, अतिक कुरेशी, संजय पटले आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
वाहनचालकांच्या मानधनात वाढ करा
By admin | Updated: December 14, 2015 02:20 IST