सडक/अर्जुनी : तहसील कार्यालय सडक/अर्जुनीअंतर्गत येत असलेल्या कोदामेडी गावालगतच्या शासकीय जागेवर अवैध रेती ठेवण्यात आली आहे. मात्र रेतीचा हा अवैध साठा कुणाचा? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोदामेडी गावच्या पटाच्या जागेच्या परिसरातील शासकीय मोकळ्या जागेत जवळजवळ ५० ट्रिप अवैध रेती चार ठिकाणी ठेवली आहे. पण ही अवैध रेती कुणाची, हे अजून कळले नाही. या अवैध रेतीचा लिलाव करून विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे. सडक/अर्जुनीचे तहसीलदार उईके यांनी लक्ष देवून त्या रेतीचा लिलाव करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याची रेती ही बाहेर काढून ठेवायची व ती पावसाळ्याच्या दिवसात जास्त भावाने ग्राहकांना विकावे, असा सपाटा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. ही रेती काढण्यामागे एका वनरक्षकाचा व तलाठ्याचा सिंहाचा वाटा असल्याची माहिती एका नागरिकाने दिली आहे. या अवैध रेतीचा लिलाव करावा, असा सूर निघत आहे. (शहर प्रतिनिधी)
शासकीय जमिनीवर ठेवलेली ही अवैध रेती कुणाची?
By admin | Updated: August 14, 2014 23:47 IST