कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महामंडळातील कर्मचारी आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नसल्याने राज्य परिवहन महामंडळामागील ग्रहण सुटण्याचे नाव दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महामंडळाची अवघी व्यवस्थाच विस्कटली असून अद्याप फक्त मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. अशात महामंडळाने मध्यंतरी कंत्राटी तत्त्वावर चालक घेण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर वाहन निरीक्षकांना चालक म्हणून कामावर घेण्यात आले. असा प्रयोग करून महामंडळाने चालकांची तजवीज केली. मात्र, वाहक नसल्याने आगारांना आता वाहकांची गरज भासत आहे. बसमध्ये चालक असून वाहक नसणे योग्य नाही, अशात आता महामंडळाने सेवानिवृत्त वाहकांना कामावर घेण्यास परवानगी दिली. अशात सेवानिवृत्तांच्या हाती बसची घंटी येणार यात शंका वाटत नाही. गोंदिया आगाराला ११ व तिरोडा आगाराला ६ वाहक मिळाल्यास दोन्ही आगारांना आणखी सोयीचे होणार, अशी माहिती आहे. तर शासनाने संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत रुजू होण्याचे आवाहन केले आहे याला किती प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष आहे.
जिल्ह्यात २८ कंत्राटी चालक महामंडळाने मध्यंतरी कंत्राटी तत्त्वावर चालक घेण्यास परवानगी दिली होती व त्यानंतर थोड्याफार प्रमाणात आता फेऱ्या सुरू झाल्या आहेत. यामध्ये गोंदिया आगाराने २३ चालक कंत्राटी तत्त्वावर घेतले आहेत. तर तिरोडा आगाराने ५ चालक कंत्राटी तत्त्वावर घेतले आहेत. याशिवाय त्यांच्याकडे ६ नियमित, २ वाहन निरीक्षक व १ चालक अधिक वाहक कार्यरत आहे.
१७ कंत्राटी वाहकांची गरज गोंदिया आगारात सध्या २३ चालक असून १२ नियमित वाहक कार्यरत आहेत. म्हणजेच चालकांच्या तुलनेत ११ वाहक कमी आहेत, तर तिरोडा आगारात १५ चालक कार्यरत असून त्यांच्याकडे ८ नियमित वाहक कार्यरत आहेत. अशात त्यांच्याकडे ६ वाहक कमी आहेत. म्हणजेच, दोन्ही आगारांत १७ वाहक कमी आहेत.
निम्म्या बस आगारातच कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना घेऊन आगारांनी फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र, तरीही बहुतांश बस आगारातच उभ्या आहेत. गोंदिया आगारात ८० बस असून त्यातील २४ बस सुरू आहेत. तर तिरोडा आगारात ४० बस असून त्यातील १४ बस सुरू आहेत. म्हणजेच, अर्ध्यापेक्षा जास्त बस आजही आगारातच उभ्या आहेत.
बहुतांश कर्मचारी आंदोलनात महामंडळाने कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी पगारवाढ, कारवाया, कंत्राटी तत्त्वावर भरती आदी प्रयोग केले. मात्र, कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून ते मागणी पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या पवित्र्यात आहेत. परिणामी, कामावर मोजकेच कर्मचारी असून बहुतांश कर्मचारी आंदोलनातच आहेत.
सध्या आगारात चालकांची संख्या जास्त असून त्या तुलनेत वाहक कमी आहेत. नियमित वाहक कामावर असले तरीही त्यांना वगळून आणखी वाहक असले तर चालकांच्या तुलनेत वाहक होऊन अधिक सोयीचे होणार. - पंकज दांडगे,आगारप्रमुख, तिरोडा