घ्यायचे तर घ्या : दुकानदारांची ग्राहकांशी उर्मट वागणूकगोंदिया : कडक उन्हाळा, प्रवाशांची वर्दळ, उन्हाने नागरीकांच्या जीवाची काहीली होत असताना शीतपेय विक्रेत्याकडून नियम धाब्यावर बसवून एमआरपी पेक्षा जास्त दराने थंड बाटलीबंद पाणी व शीतपेयांची विक्री केली जात आहे. ग्राहकांचे अज्ञान व वेळेअभावी वाद नको या वृत्तीचा पुरेपुर फायदा शितपेय विक्रेते उचलत आहेत. यामुळे ठंडा मतलब हमखास गंडा हे समीकरण सर्वत्र राजरोसपणे दिसून येत आहे.ग्राहकांना लुबाडण्याचा धंदा शीतपेय दुकानदारांकडून तेजीत सुरु आहे. शीतपेय किंवा थंड पाणी घेताना कुलींग, स्टोअरिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांना एमआरपी दरापेक्षा पाच ते दहा रुपये जास्त मोजावे लागतात. शहरातील बसस्थानके, वर्दळीचे ठिकाण, मंगल कार्यालय, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी ग्राहकांना गंडा घालण्याचे काम सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे एमआरपी किमतीतच कुलींग व स्टोअरिंग चार्जेस समाविष्ट असतात. एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तूची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र थंडपेय विक्रेत्यांकडून हा नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरु आहे. अशा दुकानदारावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने शीतपेयाच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. ग्राहकांनी दराबाबत विचारणा केली असता घ्यायचे तर घ्या नाहीतर दुसरीकडे घ्या असे उत्तर ऐकावे लागते. एमआरपी कायद्याबाबत तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. शीतपेय विक्रेत्यांकडून ग्राहकांची सर्रास लुट सुरु आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन, वजनमापे विभाग झोपलेला आहे. ग्राहकांकडून जास्त दर वसूल करणाऱ्या दुकानदारांवर छापे टाकल्याचे किंवा कठोर कारवाई केल्याचे उदाहरण नाही.
ठंडा मतलब.. हमखास गंडा
By admin | Updated: May 8, 2016 01:40 IST