अर्जुनी मोरगाव : आई हृदयविकार व वडील कोरोनाने गमावलेल्या त्या अनाथ बालकांना इटखेडा येथील सेवानिवृत्त प्राचार्य लक्ष्मणराव माटे दाम्पत्याने शनिवारी जीवनावश्यक वस्तू व रोख राशी देऊन मदतीचा हात दिला.
स्थानिक सिव्हिल लाईन परिसरात दुचाकी दुरुस्ती करणारे कोलते कुटुंबीय वास्तव्यास होते. पत्नीवर हृदयविकार शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. अवघ्या पाच महिन्यात पती रामदास कोलते यांचा मे महिन्यात कोरोनाने मृत्यू झाला. मातृ-पितृछत्र हरपल्यानंतर दोन बहिणी व अवघ्या अडीच वर्षांचा मुलगा अनाथ झाले. एक बहीण दहावी तर दुसरी आठवीत शिकत आहे. ‘लोकमत’ने या कुटुंबाची व्यथा मांडल्यानंतर गोंदिया जिल्हा प्रशासन व अनेक दानशूर व्यक्ती मदतीला धावून आले. अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. शनिवारी इटखेडा येथील निवृत्त प्राचार्य लक्ष्मणराव माटे व तारा माटे या कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व रोख दोन हजार रुपयांची मदत केली. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक वासुदेव आदमने, कनिष्ठ व्याख्याता भगवंत फुलकटवार उपस्थित होते.