गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बस स्थानकामागे असलेल्या पंचायत समिती कॉलनीत राहणाऱ्या आरोग्य सेवक सुरेश कस्तुरे यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. मात्र कस्तुरे यांनी मद्याच्या धुंदीत स्वत:च्या अपहरणाचा हा डाव रचल्याची बाब उघडकीस आली आहे. यासाठी त्यांनी आपल्या मित्राची साथ घेतली.
आरोग्य सेवक कस्तुरे रविवारी (दि. ५) सायकलने ढाकणी येथे नोकरीवर गेले होते. सायंकाळी ६.५५ वाजता त्यांच्या फोनवरून पत्नी मीना सुरेश कस्तुरे (४२) यांना फोन आला व मला दीड लाख रुपये रात्री १२ वाजतापर्यंत आणून दे, तुझ्या पतीला झाडाला बांधून ठेवले आहे. त्याला मारहाण करीत आहे. तुम्ही पैसे न आणून दिल्यास त्याचे तुकडे-तुकडे करून फेकून देईल, मग ते तुम्ही उचलून घेऊन जा, अशी धमकी देण्यात आली होती. यासंदर्भात मीना कस्तुरे यांनी रामनगर पोलिसांत तक्रार दिली असता रामनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३६४ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला होता. परंतु आरोग्य सेवक कस्तुरे याने स्वत:च मद्याच्या धुंदीत अपहरणाचे नाट्य रचले होते व त्याच दिवशी रात्री तो घरी परतल्याचे रामनगरचे ठाणेदार देवा कठाडे यांनी सांगितले.