संतोष बुकावन ।आॅनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : स्वत: अल्पशिक्षीत असूनही इतर विद्यार्थ्यानी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. शाळेत न जाता उनाडपणा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तर तो देवदूतच आहे. आपला मुलगा शाळेत जात नाही तर पालक हे शिक्षकांची नव्हे तर त्याचीच मदत घेतात असे व्यक्तिमत्व असलेल्या या इसमाचे नाव आहे हरिचंद धाडू मेश्राम.तो अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कवठा/डोंगरगाव या गावचा रहिवासी आहे. त्याची ही समाजसेवा गेल्या ३० वर्षापासून सुरु आहे. तारुण्यात असताना त्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचली. मरावे परी किर्तीरुपे उरावे, राष्ट्रसंताच्या संदेशाने त्याला प्रेरीत केले. आपण निर्धन आहोत पण समाजासाठी आपण काही तरी करावे अशी त्याने मनात खुणगाठ बांधली. समाजसेवा करत असताना मिळालेली किर्ती हिच आपली संपत्ती आहे असे तो मानतो. त्याने शिक्षणात स्वारस्य नसलेल्या विद्यार्थ्याना समजूतीने शिक्षणाच्या प्रवाहात आणायाचा चंग बांधला आहे.तो वेळ मिळेल तसा गावागावात सायकलने भ्रमण करतो. शाळेत न जाणाºया विद्यार्थ्याचा शोध घेतो. त्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून माहिती जाणून त्यांची समंती घेतो व कामाला लागतो. अशी उनाड मुल घरी वेळेवर पोहचत नाही किंवा त्यांना कुणकुण लागली तर ती पळून जातात यासाठी तो रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जातो. त्या विद्यार्थ्याला आपल्या ताब्यात घेतो. गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष यांचेकडे घेवून जावून त्या विद्यार्थ्याची समजूत घालतो. त्या विद्यार्थ्याने होकार दिला तर ठिक अन्यथा त्याला आपल्यासोबत घेऊन येनकेन प्रकारे तयार करतो.अशावेळी त्या विद्यार्थ्याच्या आंघोळ व भोजनाची तो व्यवस्था करतो, असे करत-करत त्याची ३० वर्ष या कार्यात लोटली अनेकांना यापध्दतीने दुरुस्त केले. ते आता पालक बनले आहेत असे तो सांगतो.चांगले कार्य असले तरी अडचणी येतातच याची त्याला जाणीव आहे. हे जोखीमेचे काम आहे, असे करत असताना भीती वाटत नाही काय? आपले प्राण यात कशाला घालवता? असा सल्ला नातेवाईक आपल्याला देतात. पण आपण करत असलेली ही समाजसेवक आहे. कशाला घाबरायचे? हा ध्यास घेऊन माझे कार्य अविरत सुरु आहे. यासाठी चार ते पाचदा पोलिसांनाही सामोरे जावे लागले. आपण परिसरातच नव्हे तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात हे कार्य सायकलने फिरुन करतोय. आता माझ्या या मोहिमेत मला बिडटोलाचा कृपाल गणवीर हा हातभार लावत आहे. आपण केवळ पाचवा वर्ग शिकलो. शेती करणे तसेच मिळेल त्या कामावर जाणे हा आपला व्यवसाय आहे. पण या समाजसेवेसाठी मी अधिक वेळ देतो. मला शासनाकडून काहीच मदत मिळत नाही पण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आला तर पालक आपोआपच पैसे देतात असे हरिचंद्र सांगतो.
मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हरिचंदची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:54 IST
स्वत: अल्पशिक्षीत असूनही इतर विद्यार्थ्यानी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे. शाळेत न जाता उनाडपणा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तर तो देवदूतच आहे.
मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हरिचंदची धडपड
ठळक मुद्दे३० वर्षांपासून कार्य : विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन