जनसंपर्क कार्यालय सुरू : नागरिकांशी साधणार संवादगोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सुलभतेने सोडविण्याच्या दृष्टिकोनातून व त्यांना वेळेवर न्याय मिळावा यासाठी जनसंपर्क पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी फुलचूर नाक्यावर जनसंपर्क कार्यालय सुरू केले. आपण स्वत: आठवड्यातील शनिवार, रविवार व सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार असून तातडीने त्यांचा निर्वाळा करण्यात येईल, अशी ग्वाही ना.बडोले यांनी यानिमित्ताने दिली. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी आ.खुशाल बोपचे, माजी आ. हेमंत पटले, माजी आ.केशवराव मानकर, जि.प.सभापती देवराम वळगाये, सभापती छाया दसरे, पं.स. सभापती दिलीप चौधरी, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, अशोक इंगळे, नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, विरेंद्र अंजनकर, दीपक कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ना.बडोले म्हणाले, जिल्ह्याचा विकास साधण्याकरिता शासन कटीबद्ध आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून व प्रकल्प उभारुन जिल्ह्याची सर्वतोपरी प्रगती साधली जाणार आहे. डॉ.बाबासाहेबांचे लंडनचे घर खरेदी असो की ‘बार्टी’च्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षणातून युवकांना रोजगार देण्याचे काम असो, समाजातील शेवटच्या घटकांकरिता अनेक कल्याणकारी कार्य केले जात आहे. राज्यातील शेवटच्या टोकावरील जिल्हा अशी ओळख असलेल्या जिल्ह्यातील गरीब, पीडित, बेरोजगार, मागासलेल्या समाजासाठी निरंतर कार्य करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विनोद अग्रवाल म्हणाले, जिल्हा निर्मितीनंतर १५ वर्षात अनेक पालकमंत्री या जिल्ह्यात आले, परंतु पहिल्यांदाच पालकमंत्री कार्यालय सुरू झाले आहे. कार्यकर्ते व नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या या कार्यालयाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जयंत शुक्ला यांनी तर आभार भरत क्षत्रीय यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
पालकमंत्री आठवड्यातून अडीच दिवस गोंदियात
By admin | Updated: September 13, 2015 01:35 IST