गोंदिया : यावर्षी रेतीघाटांमधून मिळणाऱ्या महसुलात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पटपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आतापर्यंत दोन वेळा झालेल्या लिलावांमधून ३७ पैकी ३१ घाटांचा लिलाव होऊन शासनाला ५ कोटी ६५ लाखांचा महसूल मिळाला. अजूनही ६ घाटांचा लिलाव होणे बाकी आहे. गेल्यावर्षी केवळ २७ घाट लिलावात गेले होते. त्यातून शासनाला अवघा २.२० कोटींचा महसूल मिळाला होता.यावर्षी लिलावासाठी ३७ रेतीघाट पात्र ठरले होते. ई-टेंडरिंगद्वारे जानेवारीत काढलेल्या निविदा प्रक्रियेत सुरूवातीला २६ घाट लिलावात गेले. त्यांची शासकीय किंमत (किमान अपेक्षित) १ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपये होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना या किमतीपेक्षा चार पट अधिक म्हणजे ५ कोटी २५ लाख २१ हजार ९५ रुपये किंमत मिळाली. त्यानंतर उर्वरित ११ रेतीघाटांसाठी दुसऱ्या वेळी लिलाव प्रक्रिया झाली. त्यात ५ घाटांचा लिलाव झाला. त्या घाटांची शासकीय किंमत (अपसेट प्राईज) ३२ लाख ८१ हजार असताना प्रत्यक्षात ३९ लाख ७६ लाख ७२२ रुपयात त्यांचा लिलाव झाला.जिल्ह्यात एकूण १०७ रेतीघाट आहेत. गेल्यावर्षी लिलावात गेलेल्या घाटांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपली. भूजल सर्व्हेक्षण विभागाने ४९ घाटांना लिलावास पात्र ठरविले होते. मात्र भौगोलिक अडचणींमुळे ४ रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करणे कठीण असल्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाकडून ४५ घाटांचाच प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी ३७ घाटांना मंजुरी मिळाली. गेल्यावर्षी ४४ रेतीघाट पात्र ठरले होते. त्यातून ४ कोटी १५ लाखांचा महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र तीन वेळा ई-टेंडरिंग केल्यानंतरही त्यापैकी केवळ २७ घाटांचा लिलाव होऊ शकला. त्यातून प्रत्यक्षात २ कोटी २० लाखांचा महसूल शासनाला मिळाला होता. त्या तुलनेत यावर्षी महसुलात चांगलीच वाढ झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)लिलाव झालेले तीन घाट वांद्यातपहिल्या ई-टेंडरिंगमध्ये गेलेल्या २७ रेतीघाटांपैकी ३ रेतीघाट अजून वांद्यात आहेत. त्या घाटांची रक्कम संबंधित कंत्राटदारांनी अजून जिल्हा प्रशासनाकडे भरलेलीच नाही. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त होऊन त्या घाटांचा पुन्हा लिलाव होऊ शकतो. त्यात राका पळसगाव, सावंगी कोहळीटोला आणि बनाथर या तीन घाटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यातील राका पळसगाव या घाटाची शासकीय किंमत २ लाख १५ हजार असताना संबंधित निविदाधारकाने आॅनलाईन निविदा भरताना ६ लाख १० हजार रुपये किंमत टाकताना एक शून्य चुकून जास्तीचा टाकला. त्यामुळे ती किंमत ६१ लाख अशी पडली. २ लाखांचा घाट ६१ लाखात घ्यावा लागत असल्यामुळे कंत्राटदार ती रक्कम भरण्याच्या मनस्थितीत नाही.
सहा घाटांसाठी फेरलिलाव
By admin | Updated: February 22, 2015 01:32 IST