अर्जुनी-मोरगाव : यावर्षी उन्हाळी धानाची आवक वाढल्याने शासनाच्या हमीभाव धान खरेदी केंद्रांवर दरवर्षीपेक्षा जास्त धानाची खरेदी झाली. परंतू विकल्या गेलेल्या पैसे शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. ज्या सहकारी संस्थांनी आपल्या बँक लिमीटमधून शेतकऱ्यांचे चुकारे अदा केले त्या संस्था देखील डबघाईस आल्याचे दिसून येत आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यावर्षी उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी १३५० रुपये प्रति क्विंटल हमी भाव निश्चित करण्यात आला होता. शासकीय खरेदी केंद्र असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला धान केंद्रावर विकला. परंतु सुमारे दीड-ते दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या विकल्या गेलेल्या धानाचे पैसे मिळाले नाहीत. आता नवीन हंगाम सुरू झाला त्यामुळे बियाणे, खत व औषधी खरेदी करण्यासाठी व मजुरी देण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. तरी सुद्धा शासनातर्फे शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगाम कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.काही सहकारी संस्थांनी आपल्या बँक लिमीटमधून पैसे काढून काही शेतकऱ्यांचे पैसे दिलेत. शेतकऱ्यांचे काम व्हावे व शासनातर्फे लवकरच आपल्याला पैसे मिळतील असा संस्थांचा उद्देश होता. परंतु शासनाच्या दिरंगाईच्या धोरणामुळे पैशांअभावी बऱ्याच संस्था डबघाईस आल्यासारख्या आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २५० रुपये प्रतिक्विंटल दराने बोनस जाहीर केला. परंतु बोनसचे पैसेही अजूनपर्यंत अडकून आहेत. (तालुका प्रतिनिधी)
धानाच्या चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची वणवण
By admin | Updated: July 18, 2015 01:21 IST