गोंदिया : जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०१५ पर्यंत आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जबर फटका बसला. यात फळपिकांसह जिरायती रबीचे पीक काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी पूर्णत: नष्ट झाले. अवकाळी पावसाने ५० टक्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ व रबी पिकांचे बाधित क्षेत्र ५,८९२.८१ हेक्टर असून नुकसान भरपाईसाठी दोन कोटी ६९ लाख ३० हजार ५९५ अपेक्षित निधी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.सदर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला या जिरायती रबी पिकाचे क्षेत्र बाधित झाले. गोंदिया तालुक्यात या पिकांचे एक हजार ९९३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १२ हजार १०० आहे. चार हजार ५०० रूपये प्रति हेक्टरप्रमाणे गोंदिया तालुक्याला ८९ लाख ६८ हजार ५०० रूपयांच्या अपेक्षित निधीची गरज आहे. गोरेगाव तालुक्यातील ६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी २५१ आहेत. त्यासाठी साडेचार हजार रूपये प्रति हेक्टरप्रमाणे दोन लाख ७० हजार रूपयांची आवश्यकता आहे. तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी होवून जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला पिकांचे सर्वाधिक तीन हजार ७८४.७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात सहा हजार १९६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश असून नुकसान भरपाईसाठी एक कोटी ७० लाख ३१ हजार ३७५ रूपयांची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे.गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीनच तालुक्यांत सदर रबी पिकांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यानुसार एकूण बाधित क्षेत्र ५८३७.७५ हेक्टर व नुकसानग्रस्त १८ हजार ५४७ शेतकरी संख्या दाखविण्यात आले असून नुकसान भरपाईसाठी २ कोटी ६२ लाख ६९ हजार ८७५ एवढ्या अपेक्षित निधीची आवश्यकता आहे. याशिवाय अवकाळी पावसाचा फटका फळपिकांनाही बसला आहे. आंबा सर्वाधिक बाधित झालेला पीक आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक फळपिकाखालील बाधित झालेला गोंदिया तालुक्यातील क्षेत्र १८ हेक्टर आहे. यात नुकसानग्रस्त शेतकरी २० असून साडेचार हजार रूपये प्रति हेक्टरप्रमाणे दोन लाख १६ हजार रूपये अपेक्षित निधी ठरविण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील १९.८० हेक्टर फळपिकांचे क्षेत्र बाधित झाले असून नुकसानग्रस्तांमध्ये ३७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यासाठी दोन लाख ३७ हजार ६०० रूपयांची गरज आहे. सालेकसा तालुक्यात १७.२६ हेक्टरे क्षेत्र बाधित असून नुकसानग्रस्तांमध्ये २४ शेतकऱ्यांचा समावेश आहे व नुकसान भरपाईसाठी दोन लाख सात हजार १२० रूपयांची गरज भासणार आहे. गोंदिया, आमगाव व सालेकसा या तीनच तालुक्यांत फळपिकांचे नुकसान दाखविण्यात आले असून एकूण बाधित क्षेत्र ५५.०६ हेक्टरे, बाधित शेतकरी संख्या ८१ व नुकसान भरपाईसाठी सहा लाख ६० हजार ७२० रूपयांचा अपेक्षित निधी नमूद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)नुकसानग्रस्त तीनच तालुक्यांचा समावेश२८ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्हाच न्हावून निघाला होता. मात्र कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणात जवस, लाखोळी, हरभरा, गहू व भाजीपाला या रबी पिकाचे बाधित क्षेत्र केवळ गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीनच तालुक्यात दाखविण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी या पाच तालुक्यातील रबी पिकांना नुकसान झाले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच गोंदिया, आमगाव व सालेकसा या तीनच तालुक्यांत फळ पिकांचे नुकसान दाखविण्यात येत आहे. तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, देवरी व अर्जुनी-मोरगाव या पाच तालुक्यांत फळपिकांचे कसलेही नुकसान दाखविण्यात आले नाही. तिरोडा तालुक्यात तर अतिवृष्टी झाल्याने आंब्याचे मोहोर पूर्णत: गळाले होते. मात्र तिरोडा तालुक्यात फळपिकांचे नुकसान शून्य दाखविण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
जिल्ह्यात ५,८९२ हेक्टर बाधित क्षेत्राला २.६९ कोटींचा निधी अपेक्षित
By admin | Updated: March 23, 2015 01:37 IST