आमगाव : तिगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका मागील अनेक महिन्यांपासून रुग्णांना सेवा देण्यासाठी असमर्थ ठरत आहे. त्यामुळे गरोदर महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. प्रसूतीच्यावेळी गरोदर महिलेला जिल्ह्याच्या ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जात नाही. त्यांना दुचाकीने किंवा सायकलने रुग्णालयात न्यावे लागते. या बाबींकडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना रुग्णवाहिका दुरुस्त करण्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. गावात आरोग्य समिती नेमलेली आहे. पण ती निद्रावस्थेत आहेत. त्यांना जाग केव्हा येणार? असा सवाल करण्यात येत आहे. शासनातर्फे १०८ नंबरवर फोन केला की रुग्णवाहिका घरी येणार, असे सांगितले जाते. पण तिगाव प्राथमिक केंद्रात अजबच प्रकार पहायला मिळतो. येथे त्या नंबरवर कितीही फोन केला तरी प्रतिसाद मिळत नाही. या आरोग्य केंद्रातील डॉक्टर तर पूर्णपणे सोंग घेऊन झोपी गेले आहेत. ‘सबला साथ सबका विकास’ या सूत्रानुसार त्यांचे कार्य चालले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा आजारी पडल्याचे दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार आता रामभरोसे आहे. या केंद्राचे ‘अच्छे दिन कधी येणार’ असे नागरिक विचारत आहेत. पण डॉक्टरांना यांच्याशी काहीच देणे-घेणे नाही. सदर डॉक्टर आपल्या चेहऱ्यावरील माशीदेखील उडवू शकत नाही, तर उपचार काय करणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शासनाने शिशु जननी शिशु सुरक्षा अभियानाचा गाजावाजा केला. परंतु या योजनेचा लाभ एकाही महिलेला होताना दिसत नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
नादुरूस्त रुग्णवाहिकेमुळे गरोदर महिलांची गैरसोय
By admin | Updated: September 3, 2014 23:30 IST