गोंदिया : मागील तीन वर्षापासून कमी-जास्त पाऊस, धानावर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे ग्रासलेल्या शेतकऱ्यांची आता अवकाळी पाऊस व गारपिटीने कंबर मोडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने शासनाकडे केली आहे.असंख्य समस्यांशी लढणारा वर्ग जर कोणता असेल तर तो शेतकरी वर्ग आहे. शासनाच्या दुर्लक्षाची पर्वा न करता हा बळीराजा आपल्या कर्तव्याची जाण ठेवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देत आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी शासनाकडून मदतीची आस लावून बसला आहे, पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला त्याची जाण नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे धान, लाखोळी, तूर व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. सिंचनाचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी मागासलेला आहे. लागवड खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे प्रमाण वाढत आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी
By admin | Updated: March 29, 2015 01:44 IST