कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. १६) १८२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १२८ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ५४ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता.
जिल्ह्यात सद्यस्थितीत गोंदिया आणि देवरी तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे, तर उर्वरित सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त बनले आहे. मागील आठ दिवसात एकाही नवीन कोरोनाबाधिताची भर पडली नसून संसर्ग नियंत्रणात आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४५०६०२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २३०४३० नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२०१७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२११ नमुने कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत ४०५०२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
.............
९ लाख १८ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे असून आतापर्यंत ९ लाख १८ हजार ४१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी ६८१७२२ नागरिकांना पहिला, तर २३६६९६ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.