विजय सूर्यवंशी : सामान्य ज्ञान परीक्षेत ९०६ विद्यार्थ्यांचा सहभागगोंदिया : विविध प्रकारच्या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. तेव्हाच जिल्ह्यातून प्रशासकीय अधिकारी घडू शकतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.जिल्हा माहिती कार्यालय व स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने व लोकमत युवा नेक्स्टच्या सहकार्याने मनोहर म्युनिसिपल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. यादरम्यान परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडके, स्टडी सर्कल गोंदिया शाखेचे संचालक श्याम मांडवेकर प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बसून यश संपादन करावे यासाठी गोंदिया जिल्ह्यातूनसुद्धा ‘घडेल प्रशासकीय अधिकारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेला जिल्हाभरातून ९०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश संपादन करण्याचे निश्चित केले आहे, हे परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून दिसून आले. सदर उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून या प्रकारच्या परीक्षांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यामागची भूमिका विषद केली. यानंतर हिवताप जनजागरण व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात लावण्यात आलेल्या तंबाखूविरोधी जनजागृतीविषयक माहिती असलेल्या प्रदर्शनाची पाहणी परिक्षार्थ्यांनी केली. या परीक्षेसाठी मनोहर म्युनिसिपल महाविद्यालयाचे प्राचार्य शर्मा, प्राचार्य रंजणेकर, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत, गर्ल्स महाविद्यालयाच्या प्रा.रेखा लिल्हारे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, आकृती थिंक टुडे संस्थेचे प्रमोद गुडधे, राजगिरी बहुउद्देशिय संस्थेचे धीरज मेश्राम, दर्पण वानखेडे, लक्की भोयर, रोशन लिल्हारे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)- जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या टिप्स४ आपण अधिकारी व्हावे, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटले पाहिजे. त्यासाठी आत्मविश्वास व संकल्पशक्ती कणखर असावी.४ विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, ग्रंथालय व वाचनालयांमध्ये जाऊन पुस्तकांचे वाचन करावे व नोट्स काढाव्यात. ४ जो विद्यार्थी यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन सराव करतो तोच यशस्वी ठरतो. स्वत:वर विश्वास ठेवून मनाची तयारी केली तर निश्चितच यश प्राप्त होईल.४ आपले घर व परिसर स्वच्छ पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष रहावे. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे. स्वच्छतेचे आणि व्यसनमुक्तीचे दूत म्हणून विद्यार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी काम करावे.
आत्मविश्वास व परिश्रमातून मिळवा यश
By admin | Updated: August 11, 2015 02:30 IST