गोंदिया : शासनाच्या विविध योजना, मोहीम व अभियानांची जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
मंगळवारी (दि.२७) ग्राम कारंजा येथील पोलीस कवायत मैदानात ७१ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. देशमुख यांनी पुरोगामी महाराष्ट्र हे देशातील एक समर्थ आणि संपन्न असे राज्य आहे, महाराष्ट्राने देशात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे, कृषी, सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे, या राज्याला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र कटिबद्ध आहे, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून, सन २०२०-२१ मध्ये २५३.६७ कोटी निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या विकासाच्या योजना राबविल्या जाणार आहेत. गोंदिया येथे सात कोटी खर्च करून जिल्हा नियोजन भवनाचे बांधकाम प्रस्तावित आहे. जिल्ह्यात असलेल्या सर्व नगर पंचायतींकरिता अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी ६.५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत दराचा लाभ मिळावा म्हणून आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात ११४ आधारभूत धान खरेदी केंद्रे उघडण्यात आलेी. १८६८ रुपये प्रतिक्विंटल दराने १६ लाख ९३ हजार ३४६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. ३६१ कोटी ७४ लक्ष ३१ हजार रुपये धान खरेदीचे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला योग्य भाव मिळण्यास मदत झाली आहे. शासनाने यावर्षी धानाला ७०० रुपये बोनस जाहीर करून धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यात रबी व खरीप हंगामासाठी ६५ हजार ३५३ खातेदारांना ३०८ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले, असे देशमुख यांनी सांगितले.
जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मत्स्यबीज व मासोळी लाभार्थ्यांना ३२.७९ लक्ष वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात ३२ हजार ८७१ नोंदीत कामगारांच्या खात्यात सहा कोटी ५७ लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांचे सतत नक्षल विरोधी अभियान लोकोपयोगी सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम राबविले जात असल्याने नक्षलवादाला आळा बसून विकासात्मक कामांना गती प्राप्त झाली आहे. राज्यात साडेबारा हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपवनसंरक्षक कुलराज सिंग, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.
--------------------------
कोरोना उपाययोजनांवर अंमल आवश्यक
याप्रसंगी नादेशमुख यांनी कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध उपाययोजना करून कोरोनामुक्तीचा दर ९६.८५ टक्क्यांवर आणला आहे. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा कोरोनामुक्ती दर अधिक आहे, तर मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या इतर जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी धोका मात्र टळला नाही. जिल्ह्यात १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली असून, लसीकरणाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. मात्र, लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी
मास्कचा वापर, सॅनिटायझेशन व फिजिकल डिस्टन्सिंग या उपाययोजनांवर अंमल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.