दिलीप बन्सोड यांचा सवाल : सहा वर्षात नवीन काय मिळाले?गोंदिया : गेल्या सहा वर्षापूर्वी तिरोडा तालुका व एकूणच विधानसभा क्षेत्रात विकासाच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल आणि गेल्या पाच-सहा वर्षाचा कार्यकाळ याची तुलना केल्यास या क्षेत्रातील स्थिती मोठी निराशाजनक अशीच दिसत आहे. कोणताही नवीन प्रकल्प नाही, शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळण्यासाठी नियोजन नाही, पुनर्वसनग्रस्तांकडे कोणी लक्ष देत नाही, शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. अशात निसर्गाचीही या परिसरावर वक्रदृष्टी आहे. अशा भकास झालेल्या वातावरण सामान्य माणसात जगण्याची आशा निर्माण करण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का, असा सवाल माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता दिलीप बन्सोड यांनी उपस्थित केला.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत बन्सोड यांनी तिरोडा परिसरातील एकूणच विकासात्मक कामांचे अलिकडील चित्र निराशाजनक असल्याचे मत व्यक्त केले.राज्यातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प आपल्या भागात आला. त्यामुळे विकासाला गती मिळाली असे वाटत नाही का? यावर बोलताना माजी आ.बन्सोड म्हणाले, निश्चितच अदानी प्रकल्पामुळे हा भाग राज्यातच नाही तर देशाच्या नकाशावर आला आहे. पण हा प्रकल्प ६ वर्षापूर्वी खा.प्रफुल्ल पटेलांनी या भागात खेचून आणला. बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासोबतच परिसरात कायापालट करण्याचे स्वप्न होते. धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांतीचे स्वप्न त्यावेळी आम्ही पाहिले होते. पण गेल्या सहा वर्षात या विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी पेलण्यात कमी पडले. त्यामुळेच त्यावेळी आम्ही रंगविलेल्या स्वप्नांचे अपेक्षित फळ मिळाल्याचे दिसून येत नाही, अशी खंत बन्सोड यांनी व्यक्त केली.केवळ तिरोडा शहराचा विकास म्हणजे विकास नाही. या विधानसभा मतदार संघातील १३९ गावांची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींची असते. या गावात सहा वर्षांपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आजही आहे. रस्ते, पाणी, सिंचन, वीज या समस्या किती सोडविण्यात आल्या? सहा वर्षापूर्वी विकासाचा वेग ज्या पद्धतीने सुरू झाला होता त्या तुलनेत गेल्या पाच वर्षात २० टक्केही कामे झाली नाहीत्त हे कटू सत्य असल्याचे बन्सोड म्हणाले.जिल्ह्याचे चित्र बदलवू शकणाऱ्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी संग्रामपूर आणि खैरबंदा जलाशयात टाकण्यासाठीची पाईपलाईन गेल्या पाच वर्षापासून पूर्ण होऊ शकली नाही, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. तालुक्यातील आंबेनाला जलाशयाची मंजुरी मी आमदार असताना मिळाली. त्यावेळी १० कोटी रुपये फक्त मालमत्ता कराचे भरले. मात्र केवळ ४ कोटी रुपयांसाठी ही योजना ६ वर्षांपासून रखडली आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आणवारी पद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. नैसर्गिक संकटात दिलासा देण्यासाठी पिक अपघाती विमा लागू करावा, अशीही मागणी त्यांनी केली. तलाठी टेबलावर बसून शेतीचा सर्व्हे करतात, मग शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी मिळणार? त्यांच्यावर कोणाचा वचक नसल्याने ही परिस्थिती असल्याचे बन्सोड म्हणाले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याची मागणी त्यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)
तिरोडा परिसराच्या विकासाला ‘ब्रेक’
By admin | Updated: December 13, 2015 01:52 IST