नगराध्यक्षाचे आरक्षण : अनेक इच्छुकांचा हिरमोडअर्जुनी-मोरगाव/बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतचे अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले. हे आरक्षण जाहीर होताच सत्ता स्थापनेच्या हालचालीला कमालीचा वेग आलेला दिसत आहे. विशेषत: काँग्रेसी खेम्यात यामुळे जल्लोष निर्माण होऊन अतिषबाजी करीत नगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आरक्षण सोडतीचे स्वागत केले. मात्र नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काही अतिउत्साही नेत्यांचा मात्र या आरक्षण सोडतीने हिरमोड झालेला दिसत आहे.आरक्षण सोडत होताच काँग्रेसने शिवसेना व अपक्ष नगरसेवकांना आपल्यासोबत घेण्याची यशस्वी शिष्टाई केल्याने अर्जुनी मोरगाव नगर पंचायतवर काँग्रेस, शिवसेना व अपक्ष अशा आघाडीचा नगराध्यक्ष बनने जवळपास निश्चित झाल्याचे राजकीय गोटात बोलल्या जात आहे. १ नोव्हेंबर रोजी झालेल्या अर्जुनी मोरगाव नगर पंचायतच्या निवडणुकीत जाणत्या मतदारांनी निवडणूक रिंगणातील सर्वच राजकीय पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांच्या मुकुटावर नगरसेवकाचा शिरपेच चढवीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. काँग्रेसला ६ जागा, भाजपला ६ जागा, राष्ट्रवादीला २ जागा, शिवसेना १ तर अपक्षांना २ जागांवर विजय मिळाला. अशा परिस्थितीत नगर पंचायतवर कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विशेष म्हणजे एस.सी. महिला काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांकडे नसल्याने नगराध्यक्षाची माळ काँग्रेसच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसकडे पोर्णिमा शहारे, वंदना शहारे, प्रज्ञा गणवीर, वंदना जांभुळकर या चार अनुसूचित जातीच्या महिला आहेत. यापैकी उच्चशिक्षित असलेल्या तसेच राजकीय सहवास लाभलेल्या पोर्णिमा शहारे यांची प्रबळ दावेदारी समजून आघाडीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. नगर पंचायतवर ताबा मिळविण्यासाठी शिवसेनेच्या ममता पवार, अपक्ष माणिक घनाडे, येमू ब्राम्हणकर या तीन नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याने सत्ता स्थापनेचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे.आजघडीला काँग्रेसकडे ९ नगरसेवकांचे संख्याबळ दिसून येत आहे. सत्ता स्थापनेच्या तडजोडीत कामात काँग्रेसचे गटनेते किशोर शहारे, तालुकाध्यक्ष भागवत नाकाडे, नगर अध्यक्ष अजय पशिने, जि.प.सदस्य गिरीश पालीवाल, युवा नेते नवीन नशिने, सुनील लंजे, सर्वेश भुतडा सक्रीय झालेले दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
अर्जुनीत काँगे्रेस, शिवसेना व अपक्ष आघाडीचा नगराध्यक्ष?
By admin | Updated: November 13, 2015 01:52 IST