गोंदिया : शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत वर्ष २०१४-१५ मध्ये राबविण्यात आलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाचा जिल्ह्यातील १४९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यांना ५८ लाख ४० हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यात पॉलिहाऊस, पॅकहाऊस, शेडनेट व फळपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुणे येथील मुुख्य कार्यालयातूनच गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरळ हे अनुदान जमा करण्यात आले आहे.मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला व फळपिके आदी संरक्षित शेतीसाठी उत्सुक दिसत आहेत. त्यासाठी कृषी विभागातून एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम (एमआयडीएच-मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट हार्टीकल्चर) राबविले जाते. या योजनेंतर्गत आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये सालेकसा तालुक्यातील बोदलबोडी परिसरात तीन शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यात एक पॉलीहाऊस, एक शेडनेड हाऊस व एक पॅकहाऊसचा समावेश आहे. याशिवाय गोंदिया तालुक्यात कटंगीकला येथे एक पॉलीहाऊस व खळबंदा येथे एक पॉलीहाऊसचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला. याच योजनेंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यात २५ शेतकरी केळीचे फळपीक घेत आहेत. यापैकी १३ शेतकरी सिंदीपार येथील असून एकूण १८.८६ हेक्टर क्षेत्रात केळीचे पीक घेतले जात आहे. तर याच योजनेतून मागील आर्थिक वर्षात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १२ शेतकऱ्यांना शेडनेटचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेतून शेतावर फळपिके, फूलपिके किंवा भाजीपाचा पिके घेतली जातात. पपई, केली ही फळपिके व फूलपिकांसाठी अनुदान दिला जातो. त्यासाठी सात-बारा, आठ (अ) आदी कागदपत्रांची गरज असून सात-बारामध्ये शेतात फळ, फूल किंवा भाजीपाला होत असल्याचे नमूद असावे. सर्व कागदपत्रांसह तसा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा लागतो. (प्रतिनिधी)काय असते शेडनेट हाऊस?शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला, वेलवर्गीय सर्व पिके, फूलपिके व कलमा रोपे लावली जातात. नऊ फूट उंचीच्या अँगल्सवर शेडनेट (हिरवी जाळी) घातली जाते. ती सर्व बाजूंनी बंद असते. वरून फॅगर सिस्टम किंवा खालून ड्रीपने रोपट्यांना पाणी दिले जाते. १० गुंठ्या ते ४० गुंठ्यापर्यंत शेडनेटसाठी अनुदान दिला जातो. हे अनुदान खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत असते. (एक हेक्टर म्हणजे १०० गुंठे व एक एकर म्हणजे ४० गुंठे)पॉलीहाऊस भाजीपाल्यासाठी न परवडणारेपॉलीहाऊससाठी १० ते ४० गुंठ्यांपर्यंत गाईडलाईन्सनुसार खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते. यात शेडनेटऐवजी प्लास्टीक पेपरचा वापर केला जात असून खालून उघडण्यासाठी झडप तयार केले असतात. आत नॅचरल कूलिंग असते. ह्युमिडिटी (दमटपणा) अधिक झाल्यास झडप उघडे केल्या जातात. यात फूलपिके व कलमा रोपांचे उत्पन्न घेतले जाते. भाजीपाल्याचे पीक घेणे पॉलीहाऊसमध्ये परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. १० गुंठ्यापर्यंत पॉलीहाऊस घालण्यास ७.५ लाखांचा खर्च येतो.
शेतकऱ्यांना ५८.४० लाखांचे अनुदान
By admin | Updated: May 1, 2015 00:04 IST