राजेश मुनिश्वर सडक-अर्जुनीसडक-अर्जुनी तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग- ६ वर मागील दोन वर्षांत ३९ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर सहा वन्य प्राण्यांनाही आपल्या जीवास मुकावे लागले. गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी मोकळा करण्यात आला. पण वन विभागाच्या कठिण नियमांमुळे डुग्गीपार ते देवपायली, डोंगरगाव/डेपो ते मासुलकसा, कोहमारा ते पांढरवाणी/रे. या मार्गांवर नागरिकांना व वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला. सन २०१३ या वर्षात ४४ अपघातात २१ नागरिकांचा जीव गेला. तर तीन वन्य प्राण्यांचादेखील मृत्यू झाला. सन २०१४ या आर्थिक वर्षात ३५ अपघातांच्या घटनांत चार नागरिकांना जीव गमवावा लागला तर तीन वन्य प्राण्यांना बळी गेला. यात निलगाय, सांबर, लांडग्या, रानडुक्कर, हरीण व अजगर सापसुद्धा ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहणांना धडक देऊन त्या सहाही वन्यप्राण्यांचा जीव जागीच गेल्याची नोंद वनविभाग सडक-अर्जुनी यांच्याकडे आहे. तर राष्ट्रीय महामार्गावर ७९ विविध अपघातात ३९ प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव गमवावा लागला. या मार्गावर जंगल भागात रुंदीकरणाची कामे झालीच नाही. त्यामुळे महामार्गावर जागो-जागी खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याचे प्रयत्नात सदर अपघात झाल्याची नोंद डुग्गीपार पोलीस ठाण्यात आहे. दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून महामार्गाची समस्या सोडविण्याची गरज आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे रात्रीच्या वेळी वाहणाऱ्या प्रखर प्रकाशामुळे वन्य प्राणी दिपतात. त्यामुळे या वन्यप्राण्यांचे अपघात होवून जीव जाते. डुग्गीपार ते देवपायली या मार्गातील शशीकरण पहाडीच्या नागमोळी वळणाचा रस्ता अरूंद असल्यामुळे नेहमीच अपघात घडतात. राष्ट्रीय महामार्गावर धावणारे वाहन हे अधिक गतीने धावत असल्याने लहान वाहन चालकांची कोंडी होवून अपघात होतात. हा राष्ट्रीय मार्ग अजून किती जीव घेणार! ही गंभीर समस्या आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून नवेगावबांध अभयारण्य आहे. यात असणारे वन्य प्राणी हे रात्रीच्या वेळी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने येताना दिसतात. अशावेळी वाहनासमोर येवून महामार्गावर जीव गमवावा लागतो. राष्ट्रीय अभयारण्यात वन्य प्राण्यांना हवे त्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे हे प्राणी गाव परिसराकडे धाव घेताना दिसत आहेत. यासाठी वन्यजीव विभागाने पिण्याचे पाण्याचे नवीन स्त्रोत तयार करण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल तयार करण्याचीही नितांत गरज आहे. अन्यथा येणाऱ्या उन्हाळ्याचे दिवसात त्या वन्यप्राण्यांना अधिक धोका उद्भवण्याचे चित्र दिसत आहे.
दोन वर्षांत ३९ प्रवाशांचा मृत्यू
By admin | Updated: March 14, 2015 01:24 IST