कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याच्या दिवसांत शहरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात पाणी आणण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानुसार, यंदाही पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण करून घेण्यात आले आहे. गरज पडल्यास तेथून पाणी आणून शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. शहराला डोंगरली येथून पाणीपुरवठा होत असून, डोंगरली येथील वैनगंगा नदीत पाण्याची पातळी घटल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. हीच परिस्थिती सन २०१८ मध्ये निर्माण झाली होती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी मागविण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दरवर्षी शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेत पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. गरज पडली तर तेथून पाणी आणून शहरातील पाणीटंचाई सोडविता येणार यासाठी हे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांपासून वरुणदेवाची जिल्ह्यावर कृपा असल्याने पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी बरसत असून, वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाली नाही. परिणामी पुजारीटोला येथून पाणी आणण्याची गरज पडली नाही. त्यात यंदाही वैनगंगा नदीत पाणी असून, तिथे बंधारा तयार केला जात असल्याने पाणी आहे. अशात यंदाही पाण्याची गरज पडण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. मात्र, ऐनवेळी गैरसोय नको यासाठी पुजारीटोला प्रकल्पात शहरातील १० दलघमी पाणी आरक्षित आहे.
मागील २ वर्षे गरज पडली नाही
- सन २०१८ मध्ये पहिल्यांदा शहरासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते व त्यानंतर सन २०१९ मध्येही पाण्याची गरज पडली होती, अशी माहिती आहे. मात्र, त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पातून शहरासाठी पाणी आणण्याची गरज पडली नाही. यंदा वैनगंगा नदीत पाणीसाठा आहे. मात्र, पुढील काळात गरज पडल्यास पाणी आणावे लागू शकते, अशी शक्यता आहे.
नुकताच याबाबत आढावा घेतला असून, सध्या तरी वैनगंगा नदीत पाणीसाठा असून, तेथे बंधारा तयार केला जात आहे. त्यामुळे आतातरी पाण्याची गरज नाही. मात्र, मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या सुरुवातीला गरज पडू शकते. यामुळे १० दलघमी पाणी आरक्षित करून ठेवले आहे. - दीनबंधू पाटील कार्यकारी अभियंता, मजिप्रा