पणजी : मध्यरात्री पणजीत भेट, अन्यथा बदनामी करू, अशी एका महिलेला धमकी देणारा फेसबुक मित्र बनलेला युवक, महिलेच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ््यात अडकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाची आणि महिलेची फेसबुकवरच फ्रेंडशिप झाली होती. युवक २३ वर्षांचा अविवाहित तर महिला ३८ वर्षांची विवाहित होती. फ्रेंडशिप रिक्वेस्ट महिलेने पाठविली होती. युवकाने ती स्वीकारून तिला फेसबुक मैत्रीण बनविले होते. दोघांनीही एकामेकांची तोंडे कधी बघितली नव्हती; परंतु कित्येक दिवस अधूनमधून दोघांचेही चॅटिंग सुरू होते. एक दिवस त्या युवकाने महिलेला भेटायला पणजीतील एका विशिष्ट ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळी बोलाविले. युवकाची विनंती महिलेने मानली नाही. आपण विवाहित असून दोन मुलांची आई असल्याचे तिने युवकाला सांगितले. त्यामुळे असे करणे योग्य होणार नाही, असे तिने सांगितले. युवक ऐकायला तयार नसल्यामुळे आग्रह कायम ठेवला. महिला काही केल्या ऐकत नाही असे पाहून शेवटी युवकाने धमकी देण्याचे तंत्र अवलंबिले. फेसबुकवरील तिचे छायाचित्र एडिट करून अश्लील स्वरूपात फेसबुकवर प्रसिद्ध करण्याची धमकी त्याने दिली. यामुळे घाबरून जाऊन महिलेने जुने गोवा येथील सायबर विभागात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी फेसबुकवरील सविस्तर माहिती मिळवून युवक वापरत असलेल्या इंटरनेटच्या आयपीच्या आधारावर त्याला हुडकून काढले. संशयित हा एक रिक्षाचालक असून मोबाइलवर तो फेसबुक वापरत होता. त्याने त्या महिलेला कधीही पाहिले नव्हते आणि महिलेने युवकाला पाहिले नव्हते, असे पोलिसांना दोघांकडूनही सांगण्यात आले. या प्रकरणात रिक्षाचालकाविरुद्ध महिलेने रीतसर गुन्हा नोंदविला नसल्यामुळे पोलिसांनी संशयिताला समज देऊन सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
‘वाट बघतोय रिक्षावाला’ तावडीत
By admin | Updated: August 25, 2014 00:54 IST