वासुदेव पागी ल्ल पणजी क्लब व कॅसिनो या अधिकृत जुगाराच्या अड्ड्यांबाहेरही मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू आहे. झोपड्या आणि पडक्या इमारतींत पत्त्यांच्या जुगारात दररोज ४० लाखांहून अधिक उलाढाल होते. गोव्यात तीन प्रकारचा पत्त्यांचा जुगार चालतो. त्यात सर्रास खेळला जाणारा जुगार हा ‘रमी’. हा खेळ केवळ आपल्याला मिळालेल्या पत्त्यांच्याच आधारे म्हणजे नशिबावरच खेळला जात नाही तर त्यासाठी कौशल्यही पणाला लावावे लागते. या प्रकारात सर्वात कमी पैशांची उलाढाल होते. एक हजारापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये अशा जुगारात उधळले जातात. अगदी एखाद्या गावातील बसशेडमध्ये किंवा एखाद्याच्या चहाच्या टपरीवरही हा जुगार मांडला जातो. दुसरा प्रकार आहे तो फ्लॅश गेम्सचा. मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणाऱ्या अशा जुगारातील उलाढाल कोट्यवधींंची असते; परंतु तो बहुतेक क्लब्स व कॅसिनोंमध्ये खेळला जातो. पत्त्यांच्या जुगाराचा विळखा सर्वाधिक आवळला गेला आहे तो ‘अंदर बाहर’ प्रकारात. संपूर्ण राज्यात दररोज या जुगारावर ४० लाखावर उलाढाल होते, अशी माहिती पोलिसांच्या विशेष गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली. गोव्यात विविध ठिकाणी पोलिसांकडून जे छापे टाकले जातात, ते अशाच प्रकारच्या अड्ड्यांवर. एखाद्या झोपडीत कंदिलाच्या उजेडातही हा जुगार चालतो. तोही लाखो रुपयांचा. सत्तरीतील तीन झोपड्या या अशा प्रकारच्या जुगारासाठी चर्चेत आहेत. या ठिकाणी काय चालते हे एखादे शेंबडे पोरही सांगू शकते, असे येथील लोक सांगतात. ‘अंदर बाहर’ जुगार हा संपूर्ण राज्यभर खेळला जातो. हे अड्डे कुठे आहेत याची माहितीही पोलीस खात्याला असते. दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात हा जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अस्नोडा येथे एकाच अड्ड्यावर तीन तासांत किमान सहा लाख रुपयांचा जुगार खेळला जातो. मोरजी व आश्वे येथील दोन अड्ड्यांवर दहा लाखांहून अधिक रुपये या जुगारावर उडविले जातात. सत्तरीतील बहुचर्चित तीन झोपड्यांतील जुगारात १५ लाखावर रक्कम उधळली जात होती. त्यानंतर पणजी, मिरामार, ताळगाव, सांतइनेज, चिंबल, मेरशी, कळंगुट, बागा, थिवी या ठिकाणी पत्त्यांच्या जुगाराचे अड्डे आहेत.
‘अंदर बाहर’वर रोज ४० लाख रुपयांची उलाढाल
By admin | Updated: July 6, 2015 00:53 IST