पणजी : बोडगेश्वर शेतकरी संघाने रस्त्यासाठीच्या शेतजमीन संपादनास विरोध केला आहे. संघातर्फे म्हापशातील हंगामी जिल्हा न्यायाधीश-१ यांच्यासमोर या प्रकरणी याचिका सादर केली आहे. या न्यायालयाने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा तसेच इतर १५ प्रतिवाद्यांना ९ जानेवारी रोजी दुपारी २.३0 वाजता न्यायालयात हजर राहण्याचा आदेश काढलेला आहे. समन्स मिळाल्यापासून ३0 दिवसांच्या आत या संदर्भातील सर्व दस्तऐवज सादर करण्यासही न्यायालयाने संबंधितांना बजावले आहे. बोडगेश्वर मंदिराजवळ सर्व्हे क्रमांक १६२ व १७४ या शेतजमिनीत लागवड होत असतानाही तेथे अतिक्रमण करून रस्त्यासाठी खोदकाम चालू केले. हे भूसंपादन करताना विश्वासात घेतले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आठ दिवसांपूर्वी म्हापसा पालिका मुख्याधिकाऱ्यांना याचिकादारांनी नोटीस काढून २४ तासांत काम बंद करण्यास सांगितले होते; परंतु काम चालूच राहिले. या याचिकेत बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे, चंद्रकांत नाईक व लक्ष्मण अमेरकर यांनी उपमुख्यमंत्र्यांसह १६ जणांना प्रतिवादी केले आहे. यात सुडा, म्हापसा पालिका, भारत सरकारचे प्रधान सचिव, केंद्रीय नगर विकास मंत्रालय, गोवा सरकारचे मुख्य सचिव, गोवा सरकारचे नगर विकास मंत्रालय, गोवा पालिका प्रशासन मंत्रालय, पालिका प्रशासन संचालक, म्हापशाचे उपजिल्हाधिकारी, म्हापसा पोलीस, बांधकाम खाते, मुख्य अभियंता-राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता विभाग १३, म्हापसा कोमुनिदाद, उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक, तसेच अन्साभाट येथील श्रीमती कमल डिसोझा यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
बोडगेश्वर शेतजमीन प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांना समन्स
By admin | Updated: January 3, 2015 01:34 IST