पणजी : राज्याला गरजेच्यावेळी (पीक अवर) १५० मेगावॅट विजेचा तुटवडा भासतो, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. वीज क्षेत्रातील सुधारणांसाठी लोकसेवा आयोगामार्फत आम्ही थेट खुल्या बाजारातून आठ ते दहा कार्यकारी अभियंत्यांची लवकरच भरती करणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी गोव्याला ३६० मेगावॅट वीज मंजूर झाली होती. आता ४८० मेगावॅट विजेचा पुरवठा व्हावा एवढी मागणी वाढली आहे. मागणी दुप्पट झाली तरी, दहा वर्षांत वीजपुरवठा वाढावा म्हणून प्रयत्न झाले नाहीत. यामुळे १५० मेगावॅट विजेचा तुटवडा भासतो. एकदा छत्तीसगढमधून २५० मेगावॅट विजेचा पुरवठा होऊ लागला की मग वीज स्थितीत सुधारणा होईल. सध्या राज्य सरकार ग्राहकांना जी वीज देत आहे, त्यावर प्रति युनीटमागे दोन रुपये तोटा होत आहे. ते म्हणाले की, सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम वीज क्षेत्रात हाती घेतले आहे. सरकार गुंतवणूक करत असल्याने पुढील वर्षी विजेच्या दरात थोडी वाढ होऊ शकते. लोकांना वेळेत वीज बिले मिळावीत म्हणून यापूर्वी एका कंपनीस काम आउटसोर्स केले होते. त्या कंपनीला हे काम जमत नाही, असे आढळून आले. त्यामुळे गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडे (जीईएल) ते काम देण्यात येणार आहे. तसेच २५० नव्या मीटर रिडरांचीही भरती केली जाणार आहे.
राज्याला १५० मेगावॅट विजेचा तुटवडा
By admin | Updated: June 26, 2014 01:24 IST