पणजी : कांदोळी किनाऱ्यावर घातलेले डेक बेड्स (खाटा) पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून उद्ध्वस्त केल्याने संतप्त शॅकमालकांनी बुधवारी पर्यटन संचालक अमेय अभ्यंकर यांना सचिवालयात जाब विचारला. पर्यटन खात्यानेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत किनाऱ्यांवरील बेकायदा बांधकामांवर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. यामुळे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शॅकमालकांनी शुल्क न भरल्याच्या कारणास्तव कांदोळी किनाऱ्यावरील सुमारे ६0 डेक बेड्स (खाटा) पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात हटविले. या कारवाईमुळे संतापलेले शंभरेक शॅकमालक सकाळी येथील पर्यटन भवनात संचालकांना घेराव घालण्यासाठी जमले. त्यांच्यासोबत आमदार मायकल लोबो, फादर मेवरिक फर्नांडिस हेही होते; परंतु संचालक अमेय अभ्यंकर हे पर्वरी येथे सचिवालयात असल्याची माहिती मिळाल्यावर शॅकमालकांनी तेथे मोर्चा वळविला. सचिवालयात पाजचणांच्या शिष्टमंडळाने अभ्यंकर यांची भेट घेतली असता त्यांनी, आपण मुंबईत होतो आणि कारवाईबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले; परंतु या उत्तराने शॅकमालकांचे समाधान झाले नाही. यंदा विदेशी पर्यटकांची संख्या कमालीची घटल्याने शॅक व्यावसायिकांचा व्यवसाय बसलेला आहे. ग्राहक नसल्याने उत्पन्नही नाही. त्यामुळे किनाऱ्यांवरील डेक बेडचे शुल्क माफ करावे, असा प्रस्ताव घेऊन काही शॅकवाले त्या वेळी पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांना भेटले होते. तेव्हा शुल्क भरू नका, आपण काय ते बघतो, असे पर्रीकरांनी सांगितले होते. शॅकवाल्यांनी याची आठवण संचालकांना करून दिली. (प्रतिनिधी)
शॅकमालक-पर्यटन खाते संघर्ष
By admin | Updated: February 12, 2015 01:43 IST