पणजी : दोनापावल, कोको बिच आणि शापोरा नदी या तीन ठिकाणी पाण्यावर सी-प्लेन उतरणार आहे. मरिटाईम एनर्जी हेली एअर सर्व्हिसेस (मेहेर) या कंपनीशी गोवा सरकारचा समझोता करार झालेला आहे. येत्या वर्षी अगदी लवकरच या योजनेची कार्यवाही केली जाणार आहे. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी शनिवारी याबाबतची सविस्तर माहिती ‘लोकमत’ला दिली. परुळेकर म्हणाले, की सी-प्लेनची संकल्पना गोव्यात प्रथमच अस्तित्वात येत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण तीन जागा आम्ही सी-प्लेनसाठी निश्चित केल्या आहेत. दाबोळीहून सी-प्लेन दोनापावल येथील समुद्रात येऊन उतरेल. तिथून ते कोको बिच येथे उतरेल व तिथून शापोरा नदी असा प्रवास होईल. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून मग पुढील टप्प्यात सी-प्लेनसाठी आणखी काही जागा निश्चित करता येतील. मंत्री परुळेकर म्हणाले, की जानेवारी २०११ मध्ये मेहेर कंपनीने भारतात सी-प्लेनचे पर्यटन सुरू केले. गोव्यात अशा प्रकारचे पर्यटन सुरू करण्यासाठी या कंपनीशी राज्य सरकारचा करार झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी मेहेर कंपनीचे सी-प्लेन गोव्यात आले होते. त्या वेळी या सेवेचा शुभारंभ करण्यास नागरी उड्डाण मंत्रालयाने परवानगीही दिली होती. तथापि, त्या वेळी राज्यात सत्ता बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या वेळी लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती व आमच्याकडे कुठलीच खाती नव्हती. त्यामुळे शुभारंभ होऊ शकला नाही. आता लवकरच शुभारंभ होईल. त्यासाठी फक्त नागरी उड्डाण मंत्रालयाची परवानगी हवी आहे. रोप वे प्रकल्प सुरू करण्यासाठीही तयारी पूर्ण करण्यात आली आहे. रेईश मागूश फोर्टकडून रोप वे सुरू होईल. ती जागा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याने भू-संपादनाची प्रक्रिया थोडी लांबली आहे. येत्या वर्षी भू-संपादन पूर्ण होईल. त्यानंतर बांधा वापरा व परत करा (बूट) तत्त्वावर रोप वे प्रकल्प सुरू केला जाईल. सर्व तयारी व योजना पूर्ण झालेली आहे, असे परुळेकर यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)
तीन ठिकाणी सी-प्लेन
By admin | Updated: December 28, 2014 09:38 IST