पणजी : बार्देस तालुक्याच्या किनारपट्टी भागात यापुढे एकाच वेळी दोन इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव करण्यास सरकार परवानगी देणार नाही, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले. सुपरसॉनिक नृत्य महोत्सवावेळी एका युवतीचा मृत्यू झाला. दोन महोत्सवांमुळे बार्देस तालुक्यातील वाहतूक व्यवस्थेवरही ताण आला. या पार्श्वभूमीवर या प्रतिनिधीने मंत्री परुळेकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, माझी शुक्रवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी चर्चा झाली. एकाच वेळी दोन नृत्य महोत्सव होऊ नयेत, असे आमचे मत बनले आहे. पुढील वर्षापासून एका वेळी एकच नृत्य महोत्सव होईल, एवढी काळजी आम्ही घेऊ. मंत्री परुळेकर म्हणाले की, अनेकदा दोन्ही नृत्य महोत्सवांचे आयोजक अगोदरच प्रेक्षकांचे बुकिंग सुरू करतात. आमच्याकडून परवानगी मिळण्यापूर्वीच तिकीट विक्रीही सुरू होते. मग शेवटच्या क्षणी दोन्ही नृत्य महोत्सवांचे आयोजक सरकारकडे मान्यता मागतात. यापुढे आम्ही ठामपणे नकार देऊ. अगोदरच तिकीट विक्री केली गेली तर सरकार त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही, असे आयोजकांना बजावण्यात येणार आहे. एकाच वेळी दोन इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव करण्यास आम्ही परवानगी देणार नाही. गरज पडल्यास आम्ही लॉट्स काढून एका आयोजकालाच नृत्य महोत्सव आयोजित करण्यास देऊ. दरम्यान, पुढील वर्षी उसगाव येथे नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव नाही, असे मंत्री परुळेकर यांनी सांगितले. उसगावच्या टोकाला पर्यटक जाणार नाहीत. आम्ही उसगावला नृत्य महोत्सव आयोजित करण्यास मान्यता देण्याचा विचार केलेला नाही, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)
एकाच वेळी दोन नृत्य महोत्सव यापुढे अशक्य!
By admin | Updated: January 3, 2015 01:34 IST