मडगाव : वास्को येथील नाईक सासू-सुनेच्या हत्या प्रकरणाची आपल्याला कुठलीही माहिती नाही, असा दावा या प्रकरणाची संशयित असलेली प्रतिमा नाईक हिचा भावोजी अभिजित कोरगावकर हा करीत असला, तरी त्याच्याकडून पोलिसांनी ज्या वस्तू जप्त केल्यात त्यात गळा आवळण्यासाठी वापरलेली नायलॉनची दोरी व झोपेच्या गोळ्यांची पावडर सापडल्याची माहिती सरकारी वकील सरोजिनी सार्दिन यांनी बुधवारी न्यायालयाला दिली. या खून प्रकरणातील सहआरोपी असलेल्या अभिजित कोरगावकर याने जामिनासाठी अर्ज केला असून, बुधवारी दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. सरदेसाई यांनी निकाल शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला. प्रतिमा नाईक हिने आपली सासू व जावेचा खून केल्यानंतर चोरलेले दागिने अभिजितकडे दिल्याचा दावा आहे. कोरगावकर याची बाजू मांडताना अॅड. राजीव गोमीस यांनी या खुनाची आपल्या अशिलाला कुठलीही माहिती नव्हती, असा दावा केला. केवळ दागिन्यांचे पार्सल नेण्यापुरता त्याचा संबंध होता आणि प्रत्यक्ष खुनात त्याचा कुठलाही संबंध नव्हता, असा दावा केला. मात्र, सरकारी वकील सार्दिन यांनी हा दावा खोडून काढताना या खुनाच्या १५ दिवसांआधी प्रतिमाने अभिजितला सांगून नवीन मोबाईल व नवीन सीमकार्ड मागवून घेतले होते. ज्या दिवशी हा खून झाला, त्या दिवशी प्रतिमाने त्याला फोन करून तयार राहाण्यास सांगितले होते व रात्री उशिरा त्याला बोलावून घेण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी या खुनाचा संपूर्ण वास्कोत गवगवा झाला. असे असतानाही या खुनाची आपल्याला कल्पना नाही, असा दावा संशयित कसा करू शकतो, असा सवाल करून या खुनाचा प्रकार प्राथमिक अवस्थेत असल्याने संशयिताला जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. संशयित कोरगावकर याच्याकडून केवळ सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केलेली नसून या खुनासाठी वापरलेली नायलॉन दोरी, खून करण्यापूर्वी बेशुद्ध करण्यासाठी वापरलेली झोपेच्या गोळ्यांची पावडर तसेच मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहे, याकडे सार्दिन यांनी लक्ष वेधले. या प्रकरणात वास्कोचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
खुनासाठी वापरलेली दोरी सापडली
By admin | Updated: February 12, 2015 01:43 IST