पणजी : जुवारी नदीवर नवा सहा पदरी पूल बांधण्याबाबत सल्लागार कंपनीने यापूर्वी दिलेला अहवाल गोवा सरकारने मान्य केलेला आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामासाठी प्रत्यक्ष निविदा जारी होण्यास वर्षभराचा कालावधी जाणार आहे.एस. एन. भोबे आणि एका बेल्जियन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने चालणार्या यंत्रणेस सरकारने जुवारीबाबतचा सल्ला प्रकल्प अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या यंत्रणेचा प्राथमिक अहवाल सरकारने मान्य केला आहे. तथापि, जुवारीवर सहा पदरी पूल उभा केला जाणार असल्याने या पुलाबाबतचे डिझाईन सल्लागार कंपनीकडून यापुढे येणार्या तपशीलवार अहवालांवर अवलंबून असेल, असे सरकारचे म्हणणे आहे. बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनीही सोमवारी पत्रकारांशी बोलताना यास दुजोरा दिला. एकूण तीन कोटी रुपये खर्चून जुवारी पुलाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. या पुलाच्या बांधकामावर सुमारे एक हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. एकदा निविदा जारी करून कामाचा आदेश दिल्यानंतर काम पूर्ण होण्यास साडेतीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल, असे बांधकाम खात्याचे म्हणणे आहे. गोवा व केंद्र सरकारदरम्यान यापुढील काळात जुवारीवरील नव्या पुलाबाबत समझोता करार होणार आहे. त्या वेळीच गोव्याने व केंद्राने खर्चरचा किती वाटा उचलावा ते ठरणार आहे. दरम्यान, सध्याच्या जुवारी पुलाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनेही एका यंत्रणेची नियुक्ती केली आहे. (खास प्रतिनिधी)
जुवारी पुल सहा पदरीबाबतच्या अहवालास मान्यता
By admin | Updated: May 7, 2014 17:58 IST