पणजी : रोजी-रोटीचा न्याय्य हक्क मिळविण्यासाठी त्या झिजताहेत. गेले अनेक दिवस येथे आंदोलन करणाऱ्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिलाही मोठ्या संख्येने आहेत. त्यातल्या गर्भवती व आजारी महिलांना असह्य यातनांना सामोरे जावे लागत आहे. शौचालय, पाणी आणि सुरक्षा या मुख्य गैरसोयी असून सहानुभूतीसाठी दाद कुणाकडे मागायची, हा सवाल त्यांना भेडसावतो आहे. सरकारला मात्र याचे काहीच सोयरसुतक नाही. सुरक्षा रक्षकांना सुरक्षा देण्यासच सरकार कमी पडत आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी होणाऱ्या त्रासाला गेले आठ दिवस सामोरे जावे लागत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या कोणत्याही संस्था, व्यक्तींना आमच्याबाबत काहीच आपुलकी नाही का, असा सवाल त्या करत आहेत. या आंदोलनात २00 महिलांचा समावेश आहे. कॅप्टन आॅफ पोर्टसमोर मांडवीच्या किनारी थंडीच्या रात्री कुडकुडत झोपण्याची कसरत करत या महिलांनी पाच रात्री अर्धनिद्रेत जागूनच काढल्या. आताही कडाक्याची थंडी असल्याने आझाद मैदान परिसरात अंगाखाली केवळ कागद व पुठ्ठे घेऊन महिला झोपतात. त्यांना निवारा मिळावा म्हणून पुरुष आंदोलक उघड्या मैदानावर झोपतात. दोन दिवसांपासून महिला पोलीस रात्री सुरक्षेसाठी थांबत असल्याचे समाजकार्यकर्त्या स्वाती केरकर यांनी सांगितले.
गर्भवती, आजारी महिला आंदोलक त्रस्त
By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST