पणजी : पणजी मतदारसंघ कुणाचा, याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. पणजीतील एकूण २२ हजार ५७ मतदार शुक्रवार, दि. १३ रोजी पणजी पोटनिवडणुकीच्या रिंगणातील चौघा उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहेत. भाजपतर्फे सिद्धार्थ कुंकळ्येकर, काँग्रेसतर्फे सुरेंद्र फुर्तादो, अपक्ष उमेदवार समीर केळेकर व सदानंद वायंगणकर हे दोघे रिंगणात आहेत. एकूण २२ मतदान केंद्रांवरून शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया पार पडेल, असे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी सांगितले. २००५ साली भाजपमध्ये प्रवेश केलेले व पर्रीकर यांचे निष्ठावान कार्यकर्ते कुंकळ्येकर यांना भाजपने पणजीत तिकीट दिले. दुसऱ्या बाजूने पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. फुर्तादो यांनी यापूर्वी पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुका लढवल्या आहेत; पण ते कधीच जिंकले नाहीत. काँग्रेसतर्फे मात्र, ते आता प्रथमच लढत आहेत. कुंकळ्येकर हे प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. अपक्ष उमेदवार केळेकर हे आयआयटी पदवीधर आहेत. अप्रत्यक्षरीत्या आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही केळेकर यांच्यासाठी काम करत आहेत. तथापि, पणजीत भाजपविरुद्ध काँग्रेस असा थेट सामना असल्याचे मानले जात आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. उमेदवार घरोघरी जाऊन आपला प्रचार करू शकतात; पण जाहीर सभा किंवा बैठका घेता येत नाहीत. (खास प्रतिनिधी)
पणजी पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान
By admin | Updated: February 12, 2015 01:43 IST