पणजी : गोवा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर असल्याचे अलर्ट वारंवार येत असताना राज्यातील सायबर सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. गोव्यात १ हजाराहून अधिक इंटरनेट वायफाय नेटवर्क पासवर्डशिवाय खुले सोडल्यामुळे असुरक्षित असल्याचे गोवा सायबर विभाग आणि एसियन ग्रुप आॅफ सायबर स्टडिस या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात म्हटले आहे. गोव्याच्या सायबर सुरक्षेचा आढावा घेणारे सर्व्हेक्षण गोवा पोलिसांचा सायबर विभाग आणि एसियन ग्रुप आॅफ सायबर स्टडिस या संस्थेकडून हाती घेण्यात आला होता. पणजी, म्हापसा, मडगाव आणि वास्को ही शहरे त्यासाठी सर्व्हेक्षणात घेण्यात आली होती. हे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून सर्व्हेक्षण अहवाल हा गोव्याच्या सायबर सुरक्षेला धक्का देणारा आहे. १ हजारपेक्षा अधिक इंटरनेट नेटवर्कना पासवर्ड नसल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे हे नेटवर्क कुणीही कसेही वापरणे शक्य आहे. खुले सोडलेल्या काही नेटवर्कच्या सिग्नल्सही अत्यंत प्रभावी मिळत आहेत. त्यामुळे अतिरेकी गटांना आणि सायबर गुन्हेगारांनाही आपल्या कारवाया करण्यासाठी रान मोकळे मिळाले आहे. या सर्व खुला वायफाय सोडणाऱ्यांना तात्काळ पासवर्डद्वारे तो बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सायबर विभागाकडून देण्यात आली. खुल्या वायफायचा वापर गुन्हेगारीसाठी कुणी केल्यास तो खुला सोडणारा कायद्याने गुन्हेगार ठरत असतो. त्यामुळे अशा लोकांना इशारेही देण्यात आले आहेत. केवळ ४ शहरातील सर्व्हेक्षणात एवढ्या प्रचंड प्रमाणात खुले वायफाय सापडले तर सर्व शहरांचा सर्व्हे केल्यास किती भयानक चित्र समोर येऊ शकते याचा अंदाजही बांधणे कठीण आहे. (प्रतिनिधी)
पासवर्डशिवाय एक हजार वायफाय नेटवर्क
By admin | Updated: February 11, 2015 02:10 IST