पणजी : गेले दोन महिने आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या १0८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पगाराविना असल्याने त्यांनी शहरात फिरून निधी संकलन केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत नागरिकांमधील गैरसमजही दूर होण्यास या वेळी मदत झाली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर अशी वेळ यावी हे सरकारसाठी लज्जास्पद आहे; परंतु शासन स्तरावर मात्र ‘ना खंत ना खेद’ अशीचस्थिती आहे. आझाद मैदानावर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून आंदोलन सुरू असून गेले १२ दिवस उपोषण केले जात आहे. जीव्हीके ईएमआरआय व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचे वेतन दिले नव्हते. राज्यातील रुग्णवाहिकांचा दर्जा सुधारावा, व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक द्यावी, तसेच बेकायदा रुग्णसेवा पुरविणारी कंपनी कायदेशीर व्हावी या उद्देशाने कर्मचारी फेब्रुवारी महिन्यापासून रस्त्यावर उतरले. राज्यातील विविध भागातून कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलनासाठी जमलेले आहेत. रविवारी कर्मचाऱ्यांनी १८ जून रस्ता, मार्केट परिसर, चर्च स्क्वेअर या भागात फिरून लोकांची भेट घेतली. सरकार व व्यवस्थापनाबाबत लोकांना माहिती दिली. लोकांनी त्यांना मदतीचा हात देत आपापल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत केली. भाजी विक्रेते, रिक्षावाले, पानपट्टी व्यावसायिक, दुकानदार व इतरांनीही सहकार्य केले. बाहेरील कामगारांना आणून सेवा पुरवत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, येथे कर्मचाऱ्यांसाठी असलेली वीज आणि शौचालयाची सोयही बंद केली आहे. बेमुदत उपोषणाला बसलेल्या कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली आहे. अशावेळी दिवसा व रात्री शौचालयासाठी मुख्य रस्ता ओलांडून जाणे उपोषणकर्त्यांना कठीण होत आहे. वीज व शौचालयाविना या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
आंदोलक १0८ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांकडून निधी संकलन
By admin | Updated: March 31, 2015 02:00 IST