पणजी : गोव्यात काम करत असताना एक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या नात्याने माझ्या कामावर कधी मर्यादा आल्या नाहीत किंवा मला जास्त राजकीय हस्तक्षेपास सामोरे जावे लागले नाही. तथापि, गोव्यापेक्षाही अंदमानमध्ये काम करताना जास्त स्वातंत्र्य अनुभवता आले, असे वन खात्याचे प्रधान मुख्य वनपाल रिचर्ड डिसोझा यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी सांगितले. डिसोझा उद्या बुधवारी पस्तीस वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत. ‘लोकमत’ला दिलेली मुलाखत... ॅ तुम्ही अंदमानमध्येही वन खात्यात वरिष्ठपदी काम केले आहे व गोव्यातही सेवा बजावली आहे. तुम्हाला कोणता फरक जाणवला? - दिगंबर कामत मुख्यमंत्री असतानाही माझ्यावर कोणताच दबाव नव्हता व मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होते तेव्हाही कोणताच दबाव आला नाही. मला कधीही कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी बेकायदा काही करून द्या, असे सांगितले नाही. सत्तेशी संबंधित काही राजकारण्यांकडून सूचना येत होत्या; पण आपण नियमबाह्य काही केले नाही. आपण स्वत: जर ठामपणे कायद्याच्या बाजूने राहिलो तर काहीच अडचण येत नाही. गोव्यापेक्षाही अंदमानमध्ये मला कामाबाबत जास्त स्वातंत्र्य मिळाले; कारण तिथे लोकनियुक्त सरकार नव्हते. ॅ तुम्ही मूळ गोमंतकीय असला, तरी तुमचा जन्म, शिक्षण, कुटुंब याविषयी तपशिलाने काही सांगू शकाल का? - माझा जन्म लखनौमध्ये झाला व शिक्षणही तिथेच झाले. पोर्तुगीज काळात वडिलांनी शिक्षणानिमित्तच गोव्याबाहेर स्थलांतर केले. माझी आई व वडील दोघेही बार्देस तालुक्यातील. माझे जुने घर साळगावमध्ये आहे; पण मी बांबोळीत स्थायिक झालो आहे. मुलगी डॉक्टर आहे, तर मुलगा खासगी स्वरूपाची नोकरी करतो. पत्नी केंद्रीय विद्यालयात शिक्षिका आहे. ॅ निवृत्त झाल्यानंतर काय करण्याची योजना आहे? - निवृत्तीनंतर सहा महिने मी विश्रांती घ्यावी, असे ठरविले आहे. त्यानंतर मी विदेशात जाऊन माझ्या सर्व मित्रांना भेटेन. बॅडमिंटन, क्रिकेट अशा खेळांमध्ये मला खूप आवड आहे. बॅडमिंटन संघटनेचा मी अध्यक्षही आहे. हेच माझे छंद मी निवृत्तीनंतर चांगल्या प्रकारे जपेन व वाढवीन. ॅ वन खात्यात नोकरी करताना तुम्ही कोणते वैशिष्ट्यपूर्ण योगदान दिले? - माझ्या काळात नेत्रावळी व म्हादई ही दोन अभयारण्ये अस्तित्वात आली. मी असताना वन विषयक अनेक पुस्तके व अहवाल प्रसिद्ध झाले. मंगळवारीदेखील खारफुटीशीसंबंधित एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. करमळी तळ्याचा आम्ही रहेजा कंपनीकडून विकास करून घेत आहोत. चोडण अभयारण्यात इंडो-जर्मन प्रकल्प राबवत आहोत. वन क्षेत्रात अनेक विकास प्रकल्प मार्गी लावले. ॅ गोव्यात व्याघ्र क्षेत्र अस्तित्वात यावे असे तुम्हाला वाटते का? - अशा प्रकारचा निर्णय घेण्यापूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून खूप सखोल अभ्यास करावा लागेल. म्हादईच्या क्षेत्रात एक वाघ सापडला म्हणून व्याघ्र क्षेत्र करता येणार नाही. वाघांना गोव्यात जन्म दिला जातो काय, याचा शोध घ्यावा लागेल. गोव्यात पट्टेरी वाघाची ब्रिडिंग साईट आहे काय, हे तपासून पाहावे लागेल. वाघतज्ज्ञ कारंथ हे गोव्याच्या जंगलात सर्वेक्षण करत आहेतच. कारंथ यांचा प्राथमिक अहवाल हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ॅ दीर्घ काळानंतर निवृत्त होत असताना तुमच्या मनात कोणत्या भावना आहेत? - ३४ वर्षे व ९ महिने आपण सेवा बजावली. मी समाधानी आहे. प्रत्येक अधिकाऱ्याच्या जीवनात चढउतार येतात, तसे माझ्याही जीवनात आले. ९० च्या दशकात राणे सरकार अधिकारावर असताना काय घडले होते ते तुम्हाला ठाऊकच आहे. (डिसोझा या वाक्याबरोबर मनापासून हसले) अर्थात, हा सगळा इतिहास झाला. आपले कुणाशीच वाईट संबंध नाहीत.
गोव्यापेक्षा अंदमानमध्ये जास्त स्वातंत्र्य
By admin | Updated: December 30, 2014 01:20 IST