पणजी : राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. शहरात लाखोंनी पर्यटक दाखल होत असून, गाड्यांची संख्याही वाढत आहे. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून पोलिसांतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांना नौदलाचे जवानही सहकार्य करीत आहेत. तरीही बऱ्याच ठिकाणी ‘कोंडी’ होत असल्याचे दिसून येते. नववर्ष साजरे करण्यासाठी चारचाकी वाहनांबरोबरच पर्यटकांच्या बसगाड्याही शहरात दाखल होऊ लागल्या आहेत. या गाड्यांना पार्किंगची सोय उपलब्ध होत नसल्याने वाहतुकीची बिकट समस्या निर्माण होत आहे. काही पर्यटक मार्केट, अठरा जून रोड, चर्च क्वेअरनजीक मिळेल तशा गाड्या पार्क करीत आहेत. अशा बेशिस्त पार्किंगमुळेही वाहतुकीची समस्या उद्भवतेय. वाहनांच्या गर्दीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात एकमेकांना वाहने धडकण्याचे प्रकारही घडत आहेत. राजधानीतील काही प्रमुख ठिकाणी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. वाहतूक पोलीस विभाग वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी पोलिसांची कमतरता आणि नियोजनाच्या अभावामुळे यंदाही विस्कळीतपणाच दिसून येत आहे. विशेष म्हणजे बसस्थानक आणि दिवजा येथील चौकात नौदलाचे जवानही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करीत असतात. पार्किंगची अपुरी सोय आणि बेशिस्त पार्किंगमुळे राजधानीत वाहतुकीचा बोजवारा वाजलेला आहे. हे असेच चित्र राहिले तर दोन दिवसांत येथे येणाऱ्या पर्यटकांना व स्थानिकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांसाठी वाहतुकीचे काही मार्ग वळविता येतात का आणि त्यातून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होईल का, याची पडताळणी करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
वाहतुकीचा बोजवारा
By admin | Updated: December 28, 2014 09:38 IST