पणजी : कांपाल येथे झालेल्या भारतीय विज्ञान संमेलनात एकूण १ लाखाहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. त्यात ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला चालना देणारा हा उपक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारच्या साहाय्याने आयोजित केलेल्या या संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती संमेलनाचे आयोजन सचिव एच. बी. मेनन यांनी परिषदेत बोलताना दिली. देशी संशोधन आणि देशीनिर्मिती या तत्त्वावर अधिक भर देण्यात आलेल्या या संमेलनात देशीनिर्मितीचे प्रदर्शनही मांडले होते. विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडवून आणणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावणे, हा त्यामागील उद्देश होता, असे गोडसे यांनी सांगितले. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेस चालना देणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सतीश शेट्ये, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय सचिव जयंत सहस्त्रबुद्धे आणि विज्ञान भारतीच्या गोवा शाखेचे अध्यक्ष सुहास गोडसे उपस्थित होते. संमेलनस्थळी एकूण १९२ विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यात ११७ संस्थांच्या स्टॉलचा समावेश होता. केंद्रीय मंत्रालयाच्या १२ संस्था, गोवा सरकारच्या ४ संस्था आणि इतर २५ संस्थांनी भाग घेतला होता. विविध स्टॉल्समध्ये २० सॉफ्टवेअर कंपन्यांचे स्टॉल्स, २ रोबोटिक्स स्टॉल्स आणि इतर प्रकारच्या उद्योग क्षेत्राशी संबंधित स्टॉल्स होते. (प्रतिनिधी)
विज्ञान संमेलनामुळे ‘मेक इन इंडिया’ला चालना
By admin | Updated: February 11, 2015 02:11 IST