पणजी : विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांना मी व्यक्तिश: कधीच भेटलो नाही. त्यांच्याकडे मी कोणत्याच कामासाठी गेलो नाही, त्यामुळे त्यांनी माझ्याजवळ दहा कोटी रुपये मागण्याचा प्रश्नच येत नाही, असे भालचंद्र नाईक यांनी पोलिसांच्या एसआयटीला दिलेल्या जबानीत म्हटले आहे. एकूण सहा पानांमध्ये ही जबानी एसआयटीने नोंद केली आहे. माझ्या कंपनीचे संचालक गिरीश पै यांनी सहा महिन्यांपूर्वी मला सांगितले की, त्यांनी प्रतापसिंह राणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. पर्ये येथे खनिज खाण सुरू करायला आक्षेप घेऊ नका, अशी विनंती गिरीश पै यांनी राणे यांना केली. गिरीश पै यांनी मला सांगितले की, राणे यांनी त्या वेळी त्यांच्याजवळ दहा कोटी रुपये मागितले. मी स्वत: विश्वजित राणे यांनाही कधी भेटलो नाही. पै यांनी मला सांगितले की, ते स्वत: विश्वजित यांना भेटले व त्या वेळी विश्वजितनी पै यांच्याजवळ सहा कोटी रुपये मागितले. विश्वजित यांना ते सहा कोटी रुपये दिले गेले; पण हे पैसे त्यांना पै यांनी रोख स्वरूपात की अन्य कोणत्या पद्धतीने दिले ते मला ठाऊक नाही, असे भालचंद्र नाईक यांनी जबानीत म्हटले आहे. माझ्या कंपनीच्या खात्यातून मात्र हे पैसे दिले गेले नाहीत, असेही नाईक यांनी म्हटले आहे. मी राणे पिता-पुत्रांविरुद्ध जे विधान यापूर्वी केले होते, ते मागे घेतले जावे, अशी विनंती माझ्या कंपनीचे आणखी एक संचालक उदय महात्मे यांनी २ जुलै रोजी माझ्याजवळ येऊन केली. मात्र, मी त्यास नकार दिला, असे नाईक यांनी म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)
राणेंनी माझ्याजवळ लाच मागण्याचा प्रश्नच नाही
By admin | Updated: July 6, 2014 00:46 IST