मडगाव : रुबी दुर्घटना प्रकरणात कंत्राटदार बिल्डर विश्वास देसाई याची गोठवलेली बँक खाती खुली करण्यासाठी तसेच सील केलेले ऑफिस खोलण्यासाठी केलेल्या अर्जावर शुक्रवारी दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांच्या समोर सुनावणी झाली. या अर्जावर मंगळवारी निकाल अपेक्षित होता. मात्र, हा निकाल या वेळी होऊ न शकल्याने तो आता शुक्रवार, दि. ९ मे रोजी देण्यात येणार आहे.४ जानेवारी रोजी चावडी-काणकोण येथे चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ कामगारांना मरण आले होते, तर ३५ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेला जबाबदार धरून कंत्राटदार विश्वास देसाई याला अटक केली होती. या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय असल्याने संशयिताची बँक खाती गोठवली होती, तसेच ऑफिसलाही सील ठोकले होते.देसाई याच्या वतीने बाजू मांडताना ॲड. कार्लूस अल्वारिस यांनी कुणाचीही खाती गोठवण्याचा अधिकार पोलिसांना नसतो, यासाठी न्यायालयाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते. ही परवानगी न घेताच खाती गोठवल्याची केलेली कृती बेकायदेशीर आहे, त्यामुळे ही खाती खुली करावीत, असा दावा केला. तसेच रोजच्या व्यवहारासाठी संशयिताचे सील केलेले ऑफिसही खुले करावे, अशी मागणी केली होती. (प्रतिनिधी)
गोठवलेली खाती खुली करण्यासाठी देसाईच्या अर्जावर शुक्रवारी निकाल
By admin | Updated: May 7, 2014 18:03 IST