पणजी : भविष्य निर्वाह निधीत १२ टक्क्यांचे योगदान द्यावे, गेल्या सहा वर्षांचे सानुग्रह द्यावे, सुवर्ण महोत्सवी वर्षाची पाच हजार रुपयांची रक्कम द्यावी, तीस वर्षांची सेवा बजावलेल्या कामगारांसाठी नवी करिअर प्रोग्रेशन योजना राबवावी, अशा अनेक मागण्या कदंबचे चालक आणि अन्य संलग्नित कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. करारानुसार सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी द्यावी, उच्च वेतनावर नव्या कामगारांची थेट नियुक्ती केली जाऊ नये, वीस वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केलेल्या कामगारांना बढती द्यावी, सर्व वर्र्कशॉप आणि बसस्थानकांवर सुरक्षा उपाय घेतले जावेत, दर महिन्याच्या पहिल्या तारखेस वेतन द्यावे, ड्युटीवर असताना अपघात होणाऱ्या कामगारांचे संरक्षण करावे, कदंबच्या सर्व कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजनेचा लाभ द्यावा आणि सर्व एटीएम यंत्रांची दुरुस्ती करावी, अशा प्रकारच्या मागण्याही चालकांनी केल्या आहेत. कदंबच्या पर्वरी येथील डेपोजवळील सेंट्रल वर्कशॉपमध्ये कदंबचालकांची मंगळवारी सभा झाली. त्या वेळी चालकांना व अन्य संलग्नित कर्मचाऱ्यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यावर प्रकाश टाकण्यात आला. आयटकने मुख्यमंत्र्यांसमोर तसेच वाहतूक मंत्र्यांसमोर कदंब कामगारांचे प्रश्न मांडावेत, असे सभेवेळी ठरले. चंद्रकांत चोडणकर, आप्पासाहेब राणे, धनंजय नाईक, संतोष गावडे, ज्यो पिरीस, नासिमेन्तो लोबो, संजय थळी, सुंदर जल्मी, रामचंद्र शेट्ये, अशोक कोळंबकर, आत्माराम गावस, गुणी नाईक, संजय फडते गावकर, भानुदास गावकर, लिवोनारा लोटलीकर, रवींद्र नाईक, गिल्मन लोबो व कुबेर डी. नाईक यांनी सभेत भाग घेतला. (खास प्रतिनिधी)
पीएफमध्ये १२ टक्के योगदान द्या
By admin | Updated: July 9, 2014 01:05 IST