पणजी : काँग्रेस पक्षाने लोकांचे विषय हाती घ्यावे व आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असा सल्ला काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी दोनापावल येथे मंगळवारी झालेल्या काँग्रेसजनांच्या बैठकीवेळी दिला. काँग्रेसचे चार आमदार तसेच काही पदाधिकारी व माजी मंत्री या बैठकीत सहभागी झाले. काँग्रेसचे काम राज्यात वाढवा व सरकारचा गैरकारभार लोकांसमोर मांडत आक्रमकता दाखवा, असा कानमंत्र सिंग यांनी सर्व काँग्रेसजनांना दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो व विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनीही या वेळी विचार मांडले. माजी मंत्री बाबू आजगावकर, पदाधिकारी वामन चोडणकर, अमरनाथ पणजीकर, संकल्प आमोणकर, उर्फान मुल्ला आदींनी या वेळी चर्चेत भाग घेतला. फालेरो यांनी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरावे लागेल, लोकचळवळ करावी लागेल तरच काँग्रेस पक्षाजवळ लोक येतील, असा मुद्दा आजगावकर यांनी मांडला. सरकार कुठे चुकते, सरकारने दिलेली आश्वासने कशी पाळली नाहीत वगैरे गोष्टी काँग्रेस पक्षाने लोकांना पटवून द्यायला हव्यात. त्यासाठी काँग्रेसच्या नावावर मोठे झालेल्या काही माजी आमदारांनाही कामात सहभागी करून घ्या, असे आजगावकर म्हणाले. फालेरो यांना काहीजण सहकार्य करत नाहीत, अशी तक्रार आमोणकर यांनी केली. आपण जिल्हा काँग्रेसचे काम वाढवू पाहात आहे; पण काँग्रेसच्या काही आमदारांकडूनही आपल्याला सहकार्य हवे आहे. काही मतदारसंघांतील काँग्रेसजन हे पूर्णपणे आमदारांच्याच प्रभावाखाली आहेत, असे पणजीकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)
काँग्रेसजनहो आक्रमक व्हा : दिग्विजय सिंग
By admin | Updated: January 7, 2015 01:27 IST