पणजी : काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील मरणासन्न विरोधी काँग्रेस पक्षात प्राणवायू फुंकण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेवटी जाग येऊन काँग्रेसने राज्यात आंदोलनाच्या दृष्टीने आखणी केली आहे. ७ रोजी रेल्वे स्थानकांवर, तर २२ रोजी काँग्रेसतर्फे विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीची बैठक शुक्रवारी म्हापसा येथे पार पडली. त्या बैठकीवेळी दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील काँग्रेसला मार्र्गदर्शन करत पक्ष संघटनेत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने राज्य सरकारच्या गैरकारभाराविरुद्ध लढावे, अशी हाक त्यांनी उपस्थित काँग्रेसजनांना दिली. काँग्रेसने आंदोलन करणे निश्चित केले आहे. रेल्वे भाड्यात केंद्र सरकारने केलेल्या मोठ्या दरवाढीच्या निषेधार्थ येत्या ७ जुलै रोजी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील सर्व सहा रेल्वे स्थानकांवर मोर्चाचे आयोजन केले आहे. २२ जुलै रोजी विधानसभेवर मोर्चा नेऊन राज्य सरकारच्या गैरकारभाराचा निषेध केला जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ७ रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने त्या दिवशी राज्यातील थिवी, पेडणे, वास्को, करमळी, सावर्डे आणि मडगाव अशा सहा रेल्वे स्थानकांवर गट काँग्रेस समित्या मोर्चे नेतील व रेल्वे तिकीट दरवाढ मागे घेतली जावी म्हणून आंदोलन करतील, असे फर्नांडिस यांनी सांगितले. २२ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनास आरंभ होत आहे. त्या दिवशी पर्रीकर सरकारवर आरोपपत्र सादर करण्यासाठी मोर्चा नेला जाणार आहे. स्वत: दिग्विजय सिंगही या मोर्चात भाग घेणार आहेत, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. सिंग यांच्यासह फर्नांडिस, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, खासदार शांताराम नाईक, अॅड. रमाकांत खलप आदींनी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीवेळी मनोगते व्यक्त केली. आमदारांना सक्रिय करण्यास येईन काँग्रेसचे आमदार सरकारविरुद्ध संघर्ष करत नाहीत, असा मुद्दा काहीजणांनी बैठकीत मांडला. विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी आपण गोव्यात येईन. आपण आमदारांची बैठक घेईन व आमदारांना सक्रिय करीन, असे दिग्विजय सिंग यांनी सांगितले. तसेच यापुढे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकांना प्रदेशाध्यक्ष फर्नांडिसही उपस्थित राहतील, असे ते म्हणाले. महत्त्वाची पदे देऊ नका लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही बैठकीत चर्चा झाली. जे कुणी काँग्रेस पक्ष सोडून जातात, त्यांना पुन्हा पक्षात आल्यानंतर महत्त्वाचे पद दिले जाऊ नये, असा मुद्दा एका पदाधिकाऱ्याने मांडला. रवी नाईक हे यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. तिथे ते उपमुख्यमंत्री बनले. ते पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले गेले हे चुकीचे होते, असे उदाहरण या पदाधिकाऱ्याने नमूद केले. (खास प्रतिनिधी)
काँग्रेसतर्फे आंदोलनाचा नारा
By admin | Updated: June 28, 2014 01:50 IST