पणजी : मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्यात असली, तरी न्यायसंस्था याबाबत मवाळ भूमिका घेत असतात; परंतु गोव्याला हादरवणाऱ्या मांगोर हिल-वास्को येथील नाईक कुटुंबीयांच्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपी प्रतिमा नाईकला फाशीच व्हावी, या इर्षेने पोलिसांनी मजबूत केस उभी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी आवश्यक पुरावे व साक्षीदारांची शृंखला जोडण्यात पोलीस पथक गुंतले आहे. सुडाग्नीने पेटलेल्या महिलेने अत्यंत निर्दयपणे केलेले हे कृत्य गोव्याच्या इतिहासातील पहिलीच भीषण घटना असावी, असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणि खटल्याची तयारीही अत्यंत सावधगिरी बाळगून करण्यात येणार आहे. प्रतिमा ही दोषी ठरून तिला कठोरात कठोर म्हणजेच मृत्युदंडाचीच शिक्षा होईल, याबाबत आरोपपत्र दाखल करताना खबरदारी घेण्यात येणार आहे. तपासाशी संबंधित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०२नुसार अतिदुर्मिळ प्रकरणातच दोषीला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. अतिदुर्मिळ प्रकरणाचे वर्णन कायद्यात करण्यात आलेले नाही; परंतु एखादे प्रकरण तशा पद्धतीने न्यायालयात पुराव्यासह उभे करण्यास पोलिसांना यश मिळाले, तर न्यायाधीश ते अतिदुर्मिळ प्रकरण ठरवितात. क्रूरपणे केलेला बलात्कार व खून, सामूहिक हत्याकांड, अत्यंत अमानवी पद्धतीने केलेल्या हत्या, तसेच अतिरेकी कारवाया व खून यासाठीही मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
फाशीच्या शिक्षेसाठी पराकाष्ठा
By admin | Updated: February 6, 2015 01:44 IST