पणजी : सात सशस्त्र बुरखाधारी गुंडांनी घरावर दरोडा घालून ७.८ लाख रुपयांची लूट करण्याची घटना रवळनाथनगर-खोर्ली येथे घडली. घराचा दरवाजा तोडून दरोडेखोर आता शिरले आणि शस्त्रांचा धाक दाखवून घरातील सर्व सदस्यांना दोरीने बांधून घर लुटण्यात आले. जाताना त्यांची कारही घेऊन ते पळाले. रवळनाथनगर येथील केशवनाथ नाईक यांच्या घरातील मंडळी मध्यरात्रीनंतर २.३० वा. साखरझोपेत होती, त्या वेळी हा दरोडा टाकण्यात आला. घराचा दरवाजा तोडून दरोडेखोर आत शिरले. हातात चाकू-सुरे आणि लाठ्या घेऊनच ते आत शिरले. सर्वांनी तोंडावर बुरखा घातला होता. सुरी आणि दांड्यांचा धाक दाखवून घरातील मंडळींना दोरीने करकचून बांधण्यात आले. त्यानंतर कपाटाच्या चाव्या जबरदस्तीने घेऊन ते खोलण्यात आले व त्यातील सोनसाखळी, कानातील दागिने, बांगड्या व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून एकूण ७.८ लाख रुपयांची लूट करण्यात आली. त्यात दोन लाख रुपये रोख रकमेचाही समावेश आहे. पलायन करण्यासाठी चोरांनी नाईक यांची कार नेली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी केशवनाथ यांनी जुने गोवे पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदविला. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोर कोकणी व हिंदी बोलत होते. ७ पैकी दोघे धडधाकट होते, तर इतर मध्यम शरीरयष्टीचे होते. एकाच्या उजव्या हातावर लक्ष्मीचा टॅटू काढलेला होता. (प्रतिनिधी)
खोर्लीत सशस्त्र गुंडांचा दरोडा
By admin | Updated: March 10, 2016 01:56 IST