गडचिरोली : २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्यांचा २५ हजार १९७ मतांनी पराभव झाला होता. पुन्हा पाच वर्षानंतर आता ते मैदानात उतरले. परंतु मतदारांनी त्यांना संधी दिली नाही. या निवडणुकीतही धर्मरावबाबा आत्राम आपल्या पुतण्याकडून १९ हजार ८५८ मतांनी पराभूत झाले आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांच्या या पराभवामागचे प्रमुख कारणे तपासण्याची गरज आहे. धर्मरावबाबा आत्राम हे १९८० च्या दशकापासून निवडणुका लढत आहेत. १५ ते २० वर्ष ते राज्याच्या राजकारणात सक्रीय राहिले. राज्याच्या मंत्रीमंडळात ते मंत्री म्हणूनही बरेच वर्ष होते. त्यानंतरच्या काळात काही वादग्रस्त घटनांमुळे त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. अहेरी विधानसभा क्षेत्राशी त्यांचा संपर्क हवा तसा राहिला नाही. २०१२ मध्ये त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षासोबत सत्ता बसवून आपल्या कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर यांना अध्यक्ष बनविले. अडीच वर्षाच्या कारकिर्दीत हलगेकरांनी अहेरी विधानसभा क्षेत्राकडे लक्ष देऊन या भागात एक मोठे पक्ष संघटन उभे करण्याची गरज होती. परंतु धर्मराबाबा आत्रामांच्या सभोवताला जो गोतावळा निर्माण झाला तो केवळ बाबांचा उदोउदो करणारा होता. वस्तूस्थितीची जाणीव करून देणाऱ्यांची तेथे उणीव होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन कौशल्य सांभाळणारे एटापल्ली तालुक्यातील मुख्य नेतृत्व केवल सावकार अतकमवार यांच्या निधनानंतर लोप पावले. त्यामुळे येथे नाविससारख्या पक्षाला जागा मिळाली. अम्ब्रीशराव महाराजांनी गेले दोन अडीच वर्ष प्रचंड मेहनत घेतली. धर्मरावबाबा या आपल्या काकांशी आपला सामना आहे. याची जाणीव ठेवत तरूण वर्ग जोडण्याचे काम केले. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी वर्गणी देऊन तो समाज आपल्यासोबत जोडण्याचे काम केले. विश्वेश्वरराव महाराजांच्या काळापासून असलेले जुने काळ्या टोपीचे लोक व नवे जीन्सपँट घालून महागडा मोबाईल वापरणारे तरूण त्यांनी आपल्याकडे आकर्षीत केले. भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला आपण कमळावर लढायचे की नाही याबाबतही ते साशंक होते. मात्र कालांतराने त्यांनी याबाबी मान्य करीत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या साऱ्या निर्णयाचा फायदा त्यांच्या पदरात पडला. तुलनेत जिल्हा परिषदेत अडीच वर्ष सत्ता राहूनही धर्मरावबाबा आत्राम समर्थकांना या सत्तेचा वापर बाबांच्यासाठी करून घेता आला नाही. सत्तेच्या माध्यमातून केवळ अर्थकारण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला सत्तेचा कोणताही फायदा मिळालेला नाही, हे या निकालाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांना गेल्यावेळी २५ हजार १९७ व यावेळी १९ हजार ८५८ मतांनी पराभव पत्कारावे लागले. या दोन पराभवातील अंतर मागील पाच वर्षात केवळ मात्र ५ हजार ३३९ मतांनीच कमी होऊ शकले. बाबांच्या पराभवाला घराणेशाहीही कारणीभूत ठरली. त्यांनी एकट्यांनीच जिल्ह्यात उमेदवारी घेतली असती तर या निवडणुकीचे चित्र कदाचित थोडेफार बदलू शकले असते. मुलीला व त्यांना एकत्रित उमेदवारी मिळाल्याने लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला, असे आता म्हणता येण्यास बराच वाव आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
धर्मरावबाबांचा गतवेळच्या पराभवाएवढाच यंदाही पराभव
By admin | Updated: October 19, 2014 23:37 IST