कृषी विद्यापीठाचे दुर्लक्ष : कंत्राटदाराचे चार कोटींचे देयक रखडलेगडचिरोली : २५ कोटी रूपये खर्चाच्या मान्यतेचे गडचिरोली येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम फेब्रुवारी २०१० मध्ये सुरू करण्यात आले. ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराचे चार कोटींचे देयके अदा करण्यात आले नाही. निधीअभावी कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सध्या बंद पडले आहे. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी २०१० मध्ये या इमारत बांधकामाचे भूमीपूजन स्वत: करून या कामाला प्रचंड चालना दिली होती. या कामासाठी कधीही निधीची कमतरता त्यांनी भासू दिली नाही व हे काम अतिशय वेगाने पूर्ण करण्यासाठी त्यांनी कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या यंत्रणेलाही सूचना केल्या होत्या. २५ कोटी रूपये निधीतून हे कृषी महाविद्यालयाचे काम फेब्रुवारी २०१० मध्ये सुरू करण्यात आले. दोन वर्षात हे काम पूर्ण करावयाचे होते. ७५ टक्के काम पूर्ण झाले. परंतु कंत्राटदारास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी बांधकाम बिलाची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने काम बंद केले. त्यानंतर कृषी विद्यापीठाने थकीत बिलाची रक्कम कंत्राटदारास दिली व काम सुरू झाले. कंत्राटदारास आतापर्यंत १८ कोटी रूपये अदा करण्यात आले आहे. मात्र चार कोटीचे बिल अजुनही प्रलंबित आहे. त्यामुळे कंत्राटदाराने आता काम थांबविले असून सन २०१० ते २०१५ या पाच वर्षाच्या कालखंडात २२ कोटी रूपये खर्च होऊनही मुख्य इमारतीत कृषी महाविद्यालय सुरू होऊ शकलेले नाही. देयके प्रलंबित असल्याने काम रखडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पडले बंद
By admin | Updated: November 22, 2015 01:21 IST