शहरं
Join us  
Trending Stories
1
हाडे तुटली, आतड्या फाटल्या, अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचा भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर
2
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
3
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
4
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
5
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
6
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
7
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
8
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
9
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
10
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
11
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
12
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
13
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
14
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
15
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
16
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
17
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
20
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा

दिभना मार्गाचे रुंदीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:25 IST

गडचिरोली : वननाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली ...

गडचिरोली : वननाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे.

प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करा

आरमोरी : येथून गडचिरोलीला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

शहरात डुकरांचा हैदोस वाढला

कुरखेडा : कुरखेडा शहरात डुकरांचा हैदोस प्रचंड प्रमाणात वाढला आहे. नगरपंचायतीचे परिसरातील डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करून शहरातील डुकरांना हाकलून लावावे, अशी मागणी होत आहे.

पोर्ला विश्रामगृहाची दुरवस्था

पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले, परंतु या विश्रामगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृह दुरवस्थेत आहे. पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मध्यवर्ती गाव आहे. येथील विश्रामगृह अतिशय जुने आहे. या विश्रामगृहाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.

सावरगाव परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष

धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही, त्याबाबत जनजागृती करण्याची मागणी हाेत आहे.

टिपागडला अभयारण्य घाेषित करा

गडचिरोली : टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे. शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़. टिपागड पहाडापर्यंत काेरची व सावरगाववरून डांबरी रस्ता गेला आहे. नागरिकांमध्ये याबाबत जागृतीची गरज आहे.

अवैध वाहतुकीला निर्बंध घालावा

गडचिराेली : जिल्ह्यात अनेक मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला असून, याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असून, यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे वाहतूक विभाग, तसेच परिवहन विभागाने लक्ष ठेवून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला

देसाईगंज : सध्या जीवनावश्यक वस्तूंसह इतर सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. तेलाचे भाव तर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ७० ते ९० रुपयांना मिळणारे तेल पाकीट आता १२० ते १४५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडत आहे. पेट्रोलच्या दरातही वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

अहेरी : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच अहेरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युतपुरवठा खंडित होतो.

मोकळ्या जागेची स्वच्छता करा

अहेरी : शहरातील अनेक मोकळ्या जागांवर व प्लाॅटमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. हा कचरा प्लाॅटधारकांच्या खासगी जागेत असल्याने स्वच्छता कर्मचारी तो साफ करत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आणखी कचरा फेकला जातो. यामुळे घाणीचे साम्राज्य तयार होऊन शहराचे सौंदर्य बाधित होत आहे.

तालुका सीमा फलक नसल्याने संभ्रम

भामरागड : सीमेवर तालुका सीमा स्वागत फलक नाही. त्यामुळे कोणता तालुका कुठून सुरू होतो, याबाबत नवीन व्यक्ती संभ्रमात पडतो आहे. या सीमांवर सीमा स्वागत फलक लावल्यास सीमाही सुशोभित दिसेल. शिवाय शहरांच्या अंतराची माहितीही मिळेल. त्यामुळे बांधकाम विभागाने प्रत्येक तालुका सीमेवर सीमा स्वागत फलक लावावे, अशी मागणी केली आहे.

अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांची कोंडी

धानाेरा : जिल्ह्यात सिंचन विहीर योजनेची काही कामे झाली आहेत. खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, अनेकांना अनुदान मिळाले नाही.

बेरोजगारांना निधी उपलब्ध करावा

आष्टी : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंदी आहे. त्यातच कोरोनाचे सावट असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची अडचण वाढली आहे.

शिंगाडा उत्पादनासाठी हवे अर्थसाहाय्य

आरमाेरी : माजी मालगुजारी तलावात मत्स्यपालन व शिंगाड्याचे उत्पादन घेतात. परंतु, या व्यवसायाकरिता पैशाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मत्स्यपालन बिजाई व शिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने अशा संस्थांना आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थांनी केली आहे.

रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता

सिराेंचा : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.

अनेक कार्यालयांमधील बायोमेट्रिक नावापुरतेच

कोरची : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे फावले आहे.

निस्तार हक्कांची अंमलबजावणी करावी

धानाेरा : तालुक्यातील नागरिकांना दरवर्षी निस्तार बिटाच्या रूपात जळाऊ लाकडे मिळत होती. परंतु, या वर्षी लाकूड उपलब्ध न झाल्याने परिसरातील नागरिकांना इंधनाची समस्या निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांचा हैदाेस असतानाही नागरिकांना जीव धोक्यात घालून जंगलातून जळाऊ लाकडे आणावी लागत आहेत.

ओव्हरलोड वाहतुकीला आळा घालावा

गडचिराेली : नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील अंतर्गत भागातील लहान रस्त्यांवरही अवजड वाहने नेण्यात येत असल्याने या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

अनुदान देण्याची मागणी

कुरखेडा : सरकी ढेपीचे, तसेच इतरही साहित्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह दूध उत्पादक संकटात सापडले आहेत. शासनाने ढेपेचे दर कमी करून दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशी, शेळ्या आदी जनावरे पाळत आहे. मात्र महागाईमुळे अडचण होते.

ओसाड वनजमिनीवर वृक्ष लागवड करा

एटापल्ली : तालुक्यातील अनेक गावांलगत व पहाडावर असलेल्या वनजमिनी वृक्षांअभावी ओसाड पडलेल्या आहे. त्या ठिकाणी वृक्ष लागवड करावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे. बऱ्याच स्थानी वृक्षतोड झाल्याने व वृक्ष लागवड केली नसल्याने वनजमिनीचे वन अधिपत्याखालील क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संतुलनासाठी वनाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने गवत व मिश्र रोपवन कार्यक्रम राबवून वनविभागाने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात

गडचिराेली : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले. काही अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले. मात्र, बरीच अतिक्रमणे ‘जैसे थे’च आहेत.

शासकीय निवासस्थाने झाली ओसाड

आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र, शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांच्या देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत.

एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमा

गडचिराेली : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरू केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहेत. मात्र, काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे.

बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्या

कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत. त्यामुळे बेरोजगार त्रस्त झाले आहेत.

सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच

गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत जिल्ह्यात एकही मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. या भागात वीज, पाणी, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.

झिंगानूर परिसरात सिंचन सुविधा तोकड्याच

सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर हे आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीवरच उपजीविका करावी लागते. मात्र, सिंचनाअभावी शेतीसुद्धा साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दारिद्र्यात जीवन जगावे लागते. सिरोंचा तालुक्यात पाणी पातळी अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बोअरवेल किंवा विहीर देण्याची मागणी आहे. तालुक्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही.

गडचिराेली शहरात माकडांचा धुमाकूळ

गडचिराेली : शहरात सकाळपासून दिवसभर माकडांचा धुमाकूळ सुरू असतो. त्यामुळे घरांच्या छतांचे, झाडांचे फळे-फुले, घरावरील गरिबांचे कवेलू व टिनांच्या घरांचे नुकसान होत आहे. शहरात माकडांनी जंगलाची वाट सोडून शहराकडे धाव घेतली आहे. शहरातील प्रत्येक नगरातील नागरिकांना ते त्रासदायक ठरत आहे. परसबागेतील फळझाडे, पेरू, सीताफळ, पपईच्या झाडांचे नुकसान सुरू केले आहे. माकडांची टोळी एकापाठोपाठ एक घरांच्या छपरांवर रांगेत उच्छाद मांडतात.

रिक्त पदांमुळे विविध योजना कागदावरच

गडचिराेली : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पंचायत समितीने सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे; पण पदे भरली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.

तालुक्यात स्वच्छता मोहिमेचा बोजवारा

चामाेर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, काही उपद्रवी नागरिकांमुळे अभियानाचा बोजवारा उडत आहे.

बँकेसाठी दोन किमीची पायपीट

कोरची : कोरची येथील बँक ऑफ इंडिया शाखेची इमारत लहान आहे. अपुऱ्या जागेमुळे येथे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच गावापासून दोन किमी अंतरावर ही बँक आहे. त्यामुळे पायपीट करत नागरिकांना बँक गाठावी लागते. त्यामुळे गावातच भाड्याने इमारत घेऊन बँकेची व्यवस्था करावी. कोरचीमध्ये रिक्षा, ऑटो, आदी प्रवासी वाहनांची सुविधा नाही. त्यामुळे वयोवृद्धांना त्रास हाेताे.